शिवसेना नेतृत्वाने सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपशी युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक शिवसैनिकांची जबाबदारी वाढली असल्याचे मत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, येथील हिरुभाऊ गवळी मंगल कार्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीची रणनिती व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. नाशिक जिल्हा परिषदेसह सर्व तालुक्यातील पंचायत समित्यांवर सेनेचा भगवा फडकवायचा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आता जबाबदारीने आपले काम पार पाडावे असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांशी चर्चा करून, त्यांचे म्हणणे जाणून घेतल्यावर भाजपशी युती तोडण्याचा निर्णय घेतल्याचे भुसे यांनी नमूद केले. मनमाड शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व सर्व संबंधित विभागाचे मंत्री यांना विनंती करून येत्या अधिवेशनात पाणी प्रश्नावर बैठक लावण्यात येणार आहे, तसेच मनमाडकरांना दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करण्यासाठी पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी दिले. आगामी निवडणूक ही शिवसैनिकांना मोठी संधी आहे. प्रत्येक गट व गणात सेनेचा उमेदवार विजयी होईल यासाठी कामाला लागावे असे आवाहन संपर्क प्रमुख सुहास सामंत यांनी केले. यावेळी जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर माजी आमदार राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ नेते अल्ताफ खान, नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, नगरसेवक गणेश धात्रक, तालुका संघटक संजय कटारिया आदी उपस्थित होते. बैठकीस शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, शिवसैनिक उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2017 रोजी प्रकाशित
भाजपशी युती तोडल्याने शिवसैनिकांची जबाबदारी वाढली – दादा भुसे
शिवसेना नेतृत्वाने सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपशी युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-01-2017 at 01:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dada bhuse comment on bjp shiv sena alliance