स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये समन्वय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : वाणगाव डहाणू परिसरात सुमारे साडे सातशे ते आठशे हेक्टर क्षेत्रावर मिरची आणि ढोबळी मिरची लागवड करण्यात आली असून टाळेबंदीच्या काळात ठप्प झालेली मिरचीची विक्री स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी तसेच व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या समन्वयाने पुन्हा सुरू झाली आहे. या भागातून मिरचीचा प्रवास उत्तरेच्या राज्यांमध्ये सुरू झाला असून येथील शेतकरम्य़ांकरिता आशेचा किरण निर्माण झाला आहे.

वाणगाव परिसरात सुमारे ६०० हेक्टरवर हिरवी मिरची तर अडीचशे- तीनशे हेक्टर क्षेत्रावर ढोबळी व आचारी मिरचीची लागवड करण्यात आली असून बांबू, शेडनेट व खुल्या क्षेत्रावर लागवड करून यापैकी बहुतांश मिरची लागवड ठिबक सिंचन पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. या भागात ढोबळी मिरचीचे एकरी ३५ ते ४० टन तर तिखट मिरचीचे १५ ते २० टन इतके उत्पादन घेतले जात असून येथील मिरची देशातील कानाकोपऱ्यात विक्रीसाठी पाठविण्यात येते. मात्र, करोना संसर्गामुळे झालेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर येथील मिरची उत्पादनावर परिणाम झाला होता.

डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मनीष देसले, चिन्मय राऊत तसेच व्यापारी प्रतिनिधी पंकज कोरे, अमित चौबे त्यांनी तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांची भेट घेऊन स्थानिक मंडळी मिरची तोडण्यासाठी कामगारांना शेतामध्ये जाऊन देत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबत डहाणूचे उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून डहाणूचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या मदतीने स्थानिक पातळीवर बैठका घेतल्या. त्यामुळे मिरची बागायतीत मजूर काम करू लागले आहेत.

सध्या या मिरचीला उत्तरेच्या भागात मागणी असते. रोज ४५ ते ५० ट्रक भाजीपाला वाहतूक होणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर संकट निर्माण झाले होते. भाजीपाला तसेच कृषिमाल अत्यावश्यक सेवेत असल्याने त्याची वाहतूक करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊन डहाणू तालुक्यात तयार होणारी ढोबळी मिरची व हिरवी मिरचीची वाहतूक उत्तरेतील राज्यांमध्ये सुरु करण्यास आली आहे.

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री

डहाणू तालुक्यातील गंजाड येथील किसान शेतकरी गटाने यावर तोडगा काढत येथील भाजीपाला थेट वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील गृहनिर्माण सोसायटीमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था निर्माण केली. कृषी विभाग व सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांमार्फत मार्फत गृहसंस्थांशी समनवय साधून आगाऊ  नोंदणी केली जात आहे. यात टोमॅटो, वांगी, कांदा, ढोबळी मिरची, गवार इत्यादी कृषिमाल गृहसंस्थांसमोर विक्री केला जात आहे. रोज सुमारे १२ ते १३ क्विंटल भाजीपाला या पद्धतीने  विरार- वसई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जाऊ  लागला आहे. डहाणू तालुक्यातील अन्य शेतकरी गटासाठी याच पद्धतीने  योजना तयार करण्यात येत असल्याची माहिती डहाणूचे कृषी अधिकारी संतोष पवार यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahanu chilli will send to northern states for sale zws
First published on: 14-04-2020 at 01:37 IST