नितीन बोंबाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील किनारपट्टीवरील दिवा दांडीचा संरक्षक धूपप्रतिबंधक किनारा जमीनदोस्त झाल्याने किनारपट्टीवरील गावांची सुरक्षा धोक्यात आली आहे. डहाणू किनारपट्टीवरील गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाळू चोरी केली जाते. त्यामुळे किनारे खोलगट बनून समुद्राच्या लाटांचा थेट किनाऱ्यावर मारा बसत आहे. मात्र महसूल प्रशासन तसेच बंदर विकास खाते याकडे दुर्लक्ष करीत आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची तात्पुरती डागडुज्जी करण्याऐवजी धूपप्रतिबंधक किनाऱ्याचे पक्के  बांधकाम करावे यासाठी सागरी सुरक्षा तटरक्षक दलाने सरकारकडे वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

डहाणू खाडी, चिखले, नरपड, आगर बोर्डी, गुंगवाडा, वाढवणमधील आल्हाददायक समुद्रकिनाऱ्याजवळ धूपप्रतिबंधक बंधारे जमीनदोस्त झाल्याने उधाणाच्या लाटा थेट किनाऱ्यावर येत असल्याने किनाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या डहाणू समुद्रकिनाऱ्याचीही मोठय़ा प्रमाणात धूप होत असून त्यामुळे सतिपाडा, डहाणू खाडी, चिखले, नरपड, आगर, डहाणू गावातील घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही धूप रोखण्यासाठी सरकारकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.

समुद्राच्या उधाणामुळे डहाणू नगर परिषद  हद्दीतील समुद्रकिनारेही उखडले आहेत. समुद्राच्या उधाणाच्या लाटांना कोणताही अडथळा नसल्याने भरतीच्या लाटा थेट किनाऱ्यावर धडकतात. त्यामुळे किनारा खचून समुद्राचे पाणी थेट गावात शीरु लागल्याने किनारपट्टीच्या गावांमध्ये भितीचे वातावरण आहे. समुद्रकिनाऱ्याची होणारी धुप त्वरीत थांबवण्यासाठी उपाययोजना राबवावी आणि किनाऱ्याभोवती संरक्षण कठडे बांधावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून अनेक दिवसापासून करण्यात येत आहे. संरक्षण कठडा लवकरात लवकर नाही बांधला तर समुद्राचे नाही घरात शिरण्याची धोका वाढेल असे ग्रामस्थांनी सांगीतले. लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष द्दावे अशी मागणी त्यांनी केली.

वाळू चोरीमुळे किनारपट्टीची खोली वाढली

दिवा दांडीचा संरक्षक धूपप्रतिबंधक किनारा खचल्याने मांगेल वाडा, दिवा दांडी, डहाणू खाडी नाका या गावांमध्ये समुद्राचे पाणी शिरते. त्याचा परिणाम किनाऱ्यांलगत असणाऱ्या  घरांवर होत आहे. घरात, पाणी शिरणे येथे नित्याचेच झाले आहे. दिवादांडी किनाऱ्याला वाळूचोरीच्या समस्येने ग्रासले आहे. किनारपट्टीवरील वाळू चोरी होत असल्यामुळे किनारे खोल होत चालले आहेत. खचलेल्या किनाऱ्यांचा अंदाज न आल्यामुळे मच्छीमार आणि पर्यटकांच्या जीवाला अनेकदा धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्यावरील झाडे वाळूचोरीमुळे उन्मळून पडत आहेत. या सर्व समस्या दूर होण्यासाठी स्थानिक लोक सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahanu incense prevention dams landlord abn
First published on: 25-09-2020 at 00:25 IST