विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दलित जातीच्या एका महिलेला गावातील विहीरीवर सवर्णांनी पाणी नाकारले म्हणून तिच्या नवऱ्याने चक्क स्वत:ची विहीर खोदली. येथील कोळंबेश्वर गावात राहणाऱ्या बापूराव ताजणे यांच्या बायकोला गावातील विहीरीवरून पाणी भरण्यास काही गावकऱ्यांनी नकार दिला. या घटनेमुळे व्यथित झालेल्या बापूराव ताजणे यांनी स्वत:ची विहीरच खोदायला सुरूवात केली. सुरूवातीला गावातील अनेकांनी त्यांना वेड्यात काढले. मात्र, ४० दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बापूराव ताजणे यांच्या विहीरीला पाणी लागले. सध्या ही विहीर गावातील अनेक लोकांची तहान भागवत आहे. विशेष म्हणजे बापूरावांच्या विहिरीला अवघ्या १५ फुटांवर पाणी लागले आहे. आता गावातील अनेकजण या विहिरीवर पाणी भरायला येतात. मात्र, बापूराव कुणाला विरोध करत नाहीत, कुणाकडून एका रुपयाची भरपाईसुद्धा घेत नाहीत. मी खूप कष्ट करून खणलेल्या या विहीरीला इतके पाणी लागल्यामुळे मला खूप आनंद झाला असल्याचे बापूराव ताजणे यांनी सांगितले. सुरूवातीला माझ्या कुटुंबासकट सर्वांनीच मला वेड्यात काढले होते. मात्र, माझा निर्धार ढळला नाही आणि मी काम करत राहिलो, असेदेखील ताजणे यांनी सांगितले.