जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणारा अवकाळी पाऊस आता थांबला असून, हाती आलेली नुकसानीची आकडेवारी भयावह आहे. जिल्हाभर १ लाख ४१ हजार ४१४ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसला. यात ६६ हजार २८२ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त नुकसान झाले. गारांच्या माऱ्याने एकाचा बळी घेतला, तर ४९ जनावरांचाही अवकाळीने मृत्यू झाला.  
सलग दोन आठवडे जिल्हाभर अवकाळीने हाहाकार उडविला. रब्बी पिकांना मोठा फटका बसला. पावसासोबत वादळी वारे व गारांचा मारा झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. प्रशासनाने १० मार्चपर्यंत झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज जाहीर केला. एकूण १ लाख ४१ हजार ४१४ हेक्टर पिकांना अवकाळीचा तडाखा बसला. या शिवाय १ हजार ९१८ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका सेलू तालुक्याला बसला. १६ हजार १५० हेक्टरपेक्षा जास्त नुकसान सेलू तालुक्यात रब्बी पीक व फळबागांचे झाले. यात ३२९ हेक्टर फळबागांचा समावेश आहे. उर्वरित नुकसान हेक्टरमध्ये याप्रमाणे : गंगाखेड ३९ हजार १७२, परभणी १३ हजार ६९७, जिंतूर १३ हजार ७२७, पाथरी २ हजार ३९, मानवत ७ हजार ६६१, सोनपेठ १३ हजार ७५५, पालम २० हजार ७७, पूर्णा १५ हजार १३६.
परभणी तालुक्यात एकाचा गारांच्या माऱ्याने मृत्यू झाला, तर लहान २२ व मोठी २७ जनावरे दगावली. पाथरी तालुक्यातील ११ घरांचे पूर्णत: तर ५५९ घरांचे अंशत: नुकसान झाले.