Dattatray Bharne Agriculture Minister : सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणारे व विधीमंडळाचं अधिवेशन चालू असताना सभागृहात मोबाइलवर रमी खेळणारे (पत्त्यांचा खेळ) माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्यात आलं आहे. कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा हे तुलनेनं दुय्यम खातं देण्यात आलं आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते दत्तात्रय भरणे यांच्यावर कृषीखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, कृषीमंत्रिपद मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना दिलेल्या एका अजब सल्ल्यामुळे भरणेंवर टीका सुरू झाली आहे.
राज्याचे नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल अधिकाऱ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. सरळ काम सगळेच करतात. मात्र, एखादं काम वाकडं करून परत सरळ करणाऱ्यांची माणसं नोंद ठेवतात, असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. इंदापूरमधील महसूल विभागाच्या एका कार्यक्रमात भाषण करताना भरणे यांनी हे वक्तव्य केलं आहे. महसूल विभागाकडून पारदर्शकता, प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना वाकडं काम करून परत सरळ करण्याचा सल्ला दिल्याने भरणे यांच्या आगामी काळातील कारभाराबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. तसेच या वक्तव्यामुळे भरणे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
दत्ता भरणे म्हणाले, “जगात सगळ्यांसमोर अडचणी आहेत, मोठी संकटं आहेत. मात्र, या काळात आपण लोकांना सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे, तरच फायदा होतो. आज मी तुमच्यासमोर उभा आहे. कारखान्यावर संचालक झालो, चांगलं काम करू. चांगलं काम सगळेच करतात. सगळेच जण सरळ काम करतात. पण एखादं काम वाकडं करून परत सरळ नियमात बसवतात त्याच माणसांची नोंद घेतली जाते.
कोकाटेंचा खातेबदल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वतःहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने वादात अडकलेल्या माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आता त्यांच्याकडे क्रीडा हे तुलनेने दुय्यम खाते देण्यात आलं आहे, तर दत्ता भरणे यांच्यावर कृषीखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यपालांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या खातेबदलास संमती दिली नव्हती. त्यांच्या स्वाक्षरीने आदेश निघाल्यानंतरच बदल प्रत्यक्ष अमलात येतील.