विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. राजकीय नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले असून कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला जात आहे. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. विधानसभेच्या जागावाटपाबाबत आणि उमेदवारांच्या चाचपणी संदर्भात खलबतं सुरु आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. असं असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाण्यात पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केलं. "मला सांगितलं असतं तर मी संपूर्ण पार्टीच आणली असती", असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : Manoj Jarange Patil : “राज ठाकरे हे लपवाछपवीच्या पुढचे”, मनोज जरांगेंनी सुनावलं; म्हणाले, “त्यांची पळवाट…” अजित पवार काय म्हणाले? "आज एक अगळा वेगळा कार्यक्रम ठाण्यात पार पडत आहे. सी.पी.राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत पहिलाच कार्यक्रम हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या 'योद्धा कर्मयोगी-एकनाथ संभाजी शिंदे' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा पार पडत आहे. याचं सर्व श्रेय हे प्रा.प्रदीप ढवळ आणि डॉ. भालेराव यांना जातं. कारण कोणीतरी पुढाकार घ्यायचा असतो आणि कोणीतरी त्यामध्ये स्वत:ला झोकून द्यायचं असतं. त्यावेळी अशा प्रकारचं एखादं पुस्तक तयार होतं. या ठाण्याच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आजपर्यंत खूप काही घडलेलं आहे", असं अजित पवार म्हणाले. "एका शेतकरी कुटुंबातील मुलगा हा या परिसरात येतो काय? कामाला सुरुवात करतो काय? आणि त्यानंतर नगरसेवक होतो काय? त्यानंतर २००४ साली आमदार होतो काय? त्यानंतर एकदाही मागे ओळून न पाहता सातत्याने त्यांना यश मिळत जातं काय? अर्थात यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि त्यांचे स्वत:चे कष्ट, जिद्द, चिकाटी होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या रुपाने हे सर्व आपल्याला पाहायला मिळालं", असं अजित पवार म्हणाले. …तर संपूर्म पार्टीच आणली असती "माझ्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांची टर्म १९९९ साली सुरु झाली. एकनाथ शिंदे यांची टर्म २००४ साली सुरु झाली. या सर्वांमध्ये विधानसभेत सिनियर मी आहे. कारण मी १९९० च्या बॅचचा आहे. हे सर्व माझ्या नंतरच्या बॅचचे आहेत. पण हे सर्व माझ्या पुढे निघून गेले आणि मी मागे राहिलो. शेवटी ज्या-त्या गोष्टी ज्या-त्या वेळेस घडत असतात. मी गंमतीने काहींना म्हणालो की, तुम्ही ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांना सांगितलं की तुम्ही एवढे आमदार घेऊन आलात तर मुख्यमंत्री करणार, मग मला तसं सांगितलं असतं तर मी संपूर्ण पार्टीच आणली असती. शेवटी जे नशीबात असतं तेच होत असतं. आपण आपलं काम करत राहायचं", असं मोठं विधान अजित पवार यांनी केलं.