Ajit Pawar : बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाचं आज लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक नेत्यांनी भाषणं केली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात बीड जिल्ह्यातील परिस्थितीबाबत भाष्य केलं.
याचवेळी अजित पवार यांनी सभेत हुल्लडबाजी करणाऱ्यांना चांगलंच झापलं. कार्यक्रमात तुमचे नेते बोलण्यासाठी उठले की ह्या…हू… करता. अरे काय तुम्ही? कधी सुधारणार? जग कुठे चाललंय? जरा आत्मचिंतन करा असं म्हणत अजित पवारांनी भर कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्यांना झापलं.
अजित पवार काय म्हणाले?
“आज पहिल्यांदा बीड जिल्ह्यात रेल्वे येत आहे. आजच्या दिवशी फक्त मोफत प्रवास करायचा. त्यानंतर तिकिट काढून प्रवास करायचा. अन्यथा म्हणताल की त्या दिवशी आम्हाला मोफत प्रवास दिला आणि आता पैसे घेताय? मात्र, आजच्या दिवसापुरता मोफत प्रवास आहे, कारण आज उद्धघाटन आहे. त्यामुळे सवयी चांगल्या लावा”, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
“मी काहीवेळापासून पाहतोय, मी महाराष्ट्रात फिरत असतो. वेगवेगळ्या भागात जात असतो. मात्र, तुम्ही आज असे चेकाळल्यासारखं करता की तुमचे नेते उठले की ह्या…हू… करता. अरे काय तुम्ही? तुम्ही कधी सुधारणार? परत मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले म्हणता. जग कुठे चाललंय? दुसरे देश कुठे चाललेत? दुसरे राज्य कुठे चाललेत? आपण जरा आत्मचिंतन करा. आपण कशामुळे वाद घालतोय? कशासाठी समाजासमाजात तेढ निर्माण करता? आपण सर्वजण माणूस आहोत माणूस. माणुसकी दाखवा”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“शेवटी आमच्या राज्याला सर्व जाती धर्मांना न्याय द्यायाचा आहे. आम्ही जातीचं, नात्याचं राजकारण करण्यासाठी आलेलो नाहीत. आम्ही समाजाचं भलं करण्यासाठी आलेलो आहोत. देशाचे पंतप्रधान आमच्या पाठिशी आहेत”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.