अजित पवारांसह ९ जणांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये २ जुलैला मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारांसह बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची समजूत काढण्यासाठी दोनवेळा भेट घेतली आहे. पण, शरद पवार यांचे मन वळविण्यास अजित पवारांसह अन्य नेत्यांना अपयश आलं आहे. अशातच, मला राजकारणातील कोणीही काहीही शिकवलं नाही, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार यांची ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमोरे यांनी मुलाखत घेतली आहे. तेव्हा बालपण, शिक्षण, लग्न, कुटुंब, राजकारण अशा विविध विषयांवर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. यावेळी शरद पवार यांच्याशी लहानपणी संबंध कसे होते? राजकारणातील कोणत्या गोष्टी शरद पवारांनी शिकवल्या की बघत शिकला? यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले, “मला राजकारणातील कोणीही काहीही शिकवलं नाही. भाषण कसे करायचे, तेही कोणी सांगितलं नाही. राजकारणात यशस्वी व्हायचं, तर वेगवेगळे वक्ते काय विचार मांडतात? त्यांची विचार मांडण्याची पद्धत काय? कोणतं विधान केल्यावर लोकांना आपलसं कराल? सभा कशी जिंकाल? अशा गोष्टी आम्ही पाहत गेलो. त्यातून आम्ही शिकलो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काही गोष्टी तुम्हाला उपजत असल्या पाहिजेत. शिकल्यावर जेवढं सांगितलं जातं, तेवढंच येणार. पण, उपजत असेल, तर अधिकची माहिती तुम्हाला मिळते. लहानपणी आम्ही शरद पवार यांना घाबरून असायचो. तसेच, सर्व काकांपासून दूर असायचो. आम्ही कधीही कोणत्याही काकांच्या पुढे गेलो नाही. कारण, त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असायची,” असं अजित पवार यांनी म्हटलं.