Ajit Pawar on Vaishnavi Hagawane Death Case : गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. माहेरच्यांकडून सतत पैशांची मागणी केली जात असल्याने सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. दरम्यान, राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तसंच, वैष्णवी हगवणे यांच्या लग्नातही अजित पवार उपस्थित राहिले होते. यावरून आता या मृत्यूसंबंधित अजित पवारांचंही नाव जोडलं जातंय. यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
अजित पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “माझा या प्रकरणात दुरान्वयेही संबंध नाही. ज्या मुलीची दु:खद घटना घडली आहे, तिच्या वडिलांशी बोललो. मी आज कोल्हापुरातील कार्यक्रम उरकून पुण्यातील त्यांच्या घरी भेटायला जाणार आहे. या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. त्या मुलीने मला सांगितलं असतं की मला असा असा त्रास होतोय, तर आपण ताबडतोब कारवाई केली असती.”
आम्ही कस्पटे कुटुंबाच्या पाठीशी आहे
“पालकांनी इच्छा व्यक्त केली, त्यानुसार राज्याचे प्रमुख आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस आणि मी पुण्याचा पालकमंत्री या नात्याने जातीने लक्ष घालत आहोत. हगवणे परिवारातील दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे. कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही, याची काळजी पोलीस खातं घेतंय. आम्ही कस्पटे कुटुंबाच्या पाठीशी आहे”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
माझा दुरान्वयेही संबंध नाही
“माझा दुरान्वयेही संबंध नाही. तो पक्षाचा कार्यकर्ता होता. माझे विचार स्पष्ट आहेत सर्वाना माहितेय. जवळचा, लांबचा असो त्याचा विचार करत नाही. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. लग्न झालेल्या मुलींच्या बाजूने कायदा अधिक कडक केला आहे”, असाही पुनरुच्चार त्यांनी केला.
“मीडियाचे लोक माझा फोटो दाखवत आहेत, मी तुमच्या घरातील लग्नात आलो, फोटो काढला आणि काही झालं तर माझा काय दोष आहे? असे आरोप माझ्यावर होणार असतील तर मी यापुढे कोणाच्या लग्नाला नाही जाणार, असं मी बोलल्यावर समोरची लोक हसले यात माझा दोष काय?” असंही अजित पवार म्हणाले.
“यात माझा दोष नाही. यात माझा काय संबंध. मी तसं काही कृत्य करायला सांगितलं नाही. कस्पटेंच्या मुलीची दुःखद घटना घडली, यात माझा काय दोष? हे मला सांगा. मी तशा पद्धतीने कृत्य करायला सांगितलं नव्हतं”, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.