नव्या वर्षाच्या निमित्ताने सामान्य मतदारांप्रमाणेच राजकीय नेतेमंडळीही जनतेला व एकमेकांना शुभेच्छा देत असतात. मात्र, यावेळी एकमेकांवर नेतेमंडळी राजकीय टोलेबाजी करताना दिसत आहेत. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री व राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत केलेली टिप्पणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणाच्या दिशेनं आहे? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीसांना माध्यम प्रतिनिधींनी नवीन वर्षाच्या संकल्पाविषयी विचारणा केली असता त्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात हीच अपेक्षा असल्याचं नमूद केलं. “सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना सुखसमाधानाचं जावो. ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत, त्याच आमच्याही अपेक्षा असतात. लोकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करता याव्यात एवढीच इश्वरचरणी प्रार्थना आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, माध्यम प्रतिनिधींनी सध्याच्या राजकीय घडामोडींविषयी प्रश्न विचारण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आपली प्रतिक्रिया आटोपती घेत तिथून निघून गेले. मात्र, जाण्यापूर्वी त्यांनी केलेल्या खोचक टिप्पणीमुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. “नवीन वर्षाच्या निमित्ताने वाचाळवीरांना सुबुद्धी यावी, अशीही ईश्वरचरणी प्रार्थना आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांचा रोख संजय राऊतांच्याच दिशेने असावा, असं बोललं जात आहे.

“असल्या सोम्यागोम्यांवर…”, अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले, “हौशे, नौशे, गवशे…”

संजय राऊत-अजित पवार कलगीतुरा

सध्या राज्यात संजय राऊत व अजित पवार यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. संजय राऊतांनी आक्रोश मोर्चामध्ये बोलताना “अजित पवार, हवा बहोत तेज है, टोपी उड जाएगी”, अशी टिप्पणी केली. त्यावर अजित पवारांनी “अशा सोम्यागोम्यांवर मी बोलत नाही”, असं म्हणत संजय राऊतांच्या वक्तव्याला किंमत देत नसल्याचंच अप्रत्यक्षपणे सांगितलं. त्यावर संजय राऊतांनीही आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना “सध्याच्या सरकरामधले हौशे, नवशे, गवशे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकारच नाही. त्यांचे सोम्या-गोम्या दिल्लीत आहेत. गुलामी पत्करलेल्यांनी आमच्यावर बोलूच नये”, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis mocks sanjay raut on ajit pawar comment pmw
First published on: 01-01-2024 at 12:44 IST