Eknath Shinde in Delhi : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. नेत्यांचे दौरे वाढले असून पक्ष संघटनेचा आढावा नेते मंडळी कार्यकर्त्यांकडून घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन देशाचे पंतप्रधान मोदी यांची अचानक भेट घेतली. त्यामुळे या भेटीचं कारण काय? याबाबत अनेक सवाल उपस्थित करण्यात आले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींची भेट का घेतली? या भेटीत काय चर्चा झाली? याविषयची सविस्तर माहिती दिल्लीत माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच ही सदिच्छा भेट होती आणि या भेटीत दिवाळीनिमित्त मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना या भेटीबाबत प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले की, “ही भेट अचानक नव्हती. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी भेटलो. बिहार निवडणुकीमुळे त्यांचे दौरे असल्याने ते व्यस्त होते. आता दिवाळीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ही भेट सदिच्छा भेट होती.”
‘मी दिल्लीत आलो तर चर्चा होतात…’
“मी दिल्लीत आलो तरी चर्चा होतात आणि मी शेतात गेलो तरी चर्चा होतात. चर्चा करणारे चर्चा करतात, त्यांच्या चर्चा सुरू असतात, पण मी माझं काम करत असतो. पंतप्रधान मोदी हे देशासाठी जे काही काम करतात, त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे”, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
◻️LIVE | ?️ 25-10-2025 ? दिल्ली ? पत्रकारांशी संवाद
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 25, 2025
https://t.co/1oAzZsLay9
कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली?
राज्यातील राजकीय मुद्यांवर चर्चा झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शिंदे म्हणाले की, “जेव्हा आम्ही भेटतो. तेव्हा-तेव्हा पंतप्रधान मोदी विकासावर बोलत असतात. मग महाराष्ट्राच्या विकासावर असो किंवा देशाच्या विकासावर, भेटल्यावर विकासावरच चर्चा होत असते. तसेच आम्ही एनडीएचे घटकपक्ष आहोत, त्यामुळे मोदींकडून शिवसेनेला कायमच आदराचं स्थान मिळत आलेलं आहे”, असंही शिंदेंनी म्हटलं आहे.
रवींद्र धंगेकरांवर कारवाई करणार का? शिंदेंनी दिलं उत्तर
भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर रवींद्र धंगेकर हे सातत्याने आरोप करत आहेत. याबद्दल विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, “रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मी पुण्यात गेलो होतो तेव्हाही भाष्य केलं होतं, आजही करतो की प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये बेबनाव होईल असे कृत्य, वक्तव्य करू नये.”
पुढे मुरलीधर मोहळांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करणार का? असा थेट प्रश्न माध्यम प्रतिनिधिंनी विचारला असता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “धंगेकरांकडे जो पक्षाचा निरोप जायचा होता तो गेला आहे. धंगेकरांचे जे काही वक्तव्य आहे त्यासंबंधी मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतीलही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
