राहाता : ज्या शिर्डीत साईबाबांनी आपल्या रुग्णसेवेला मोठे महत्त्व दिले आणि त्याच शिर्डीत बाबांच्या शिकवणीचा विसर पडला असल्याचे चित्र आज, मंगळवारी दिसले. शिर्डी पोलीस स्टेशननजीक लक्ष्मीनगरसमोर वाहतूक पोलीस चौकीजवळ आज सकाळी दहापासून एका पुरुषाचा मृतदेह तब्बल सहासात तास उघडय़ावर पडला होता. या प्रकरणी स्थानिक पोलीस व नगरपंचायतीच्या प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे.
या मृतदेहाजवळ असलेल्या अंदाजे ९० वर्षे आजीने दिलेल्या माहितीनुसार ते धुळे येथील सोनवणे कुटुंब आहे. मृत व्यक्ती हा त्यांचा मुलगा असल्याचे सांगितले. भर उन्हात पडलेला मृतदेह आणि दु:खाने व्याकूळ झालेल्या आजीच्या मदतीसाठी उशिरापर्यंत कोणीच आले नाही. हे पाहून काहींनी घटनास्थळी जाऊन शिर्डी पोलीस ठाणे, शिर्डी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र तरीही सकाळी दहापासून उघडय़ावर पडलेला हा मृतदेह अखेर संध्याकाळी पाचला खासगी रुग्णवाहिकेतून नेऊन पुढील प्रक्रिया सुरू झाली. या वेळी माय-लेकराजवळ त्यांना धीर देण्यासाठी काही जण दिवसभर बसून होते. तर काही बघून निघून जात होते. दरम्यान, शिर्डी पोलिसांनी पाहणी केली. मात्र मदत केली नसल्याची चर्चा होती. दिवसभर नगरपरिषदेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे या वेळी उपस्थितांनी सांगितले. काही उपस्थितांनी या आजीला शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमात आश्रय मिळावा, यासाठी विचारणा केली. मात्र लेकाच्या निधनाच्या दु:खात असलेल्या आजीने मी धुळय़ाला जाईल, असे सांगत नकार दिला. या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदनानंतर कळेल.