घोडेस्वारी करताना मालकाच्या हातातून घोडा सुटला व समोरून आलेल्या घोड्यांना बघून घोडा उधळला. यामुळे पर्यटक घोड्यावरून पडून जखमी झाला. उपचारादरम्यान पर्यटकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. लतीफ खान असे मृत पर्यटकाचे नाव असून ते आपल्या पत्नीसह पाचगणी येथे पर्यटनास आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. या घटनेमुळे पाचगणी परिसरात एकच खळबळ उडाली असून टेबललँड परिसरातील घोडे मालकांचा बेजवाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

लतीफ करीम खान हे आपल्या पत्नीसह पाचगणीच्या टेबललँडवर फिरायला आले होते. लतीफ खान यांनी घोडेस्वारी करिता घोडा घेतला व त्यावरुन ते जात असताना घोडा चालकाने घोडा सोडून दिला. समोरुन येणाऱ्या चार घोड्यांना पाहून लतीफ खान यांचा घोडा उधळला. त्‍यामुळे घोड्यावर बसलेले लतीफ खाली कोसळले. त्यांच्या अंगावर घोडा पडला. जखमी झालेल्या लतीफ खान यांच्या नाका तोंडांतून रक्त आल्‍याने ते बेशुद्ध झाले. बेशुद्ध अवस्थेत त्यांना पाचगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्‍यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना वाईच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्‍यान त्यांचा मृत्यू झाला.

लतीफ खान यांचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. नवदाम्‍पत्‍य पाचगणी येथे फिरायला आले असताना ही घटना घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.