विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एमआयएम संघटनेच्या उमेदवारीमुळे दमछाक झालेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमवर दहशतवादाचा आरोप केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. एमआयएमचे नेते खासदार असियोद्दीन ओसैसी यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात इशारा दिला तरी शिंदे या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप कार्यक्रमात बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएम संघटनेत व दहशतवादी संघटनेत फरक काय, असा सवाल उपस्थित करीत एमआयएमवर टीकेची झोड उठविली होती. काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या या विधानाला एमआयएमने आक्षेप घेतला आहे. प्रणिती शिंदे यांनी आपले विधान मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी एमआयएमने केली आहे. माफी न मागितल्यास प्रणिती शिंदे यांना न्यायालयात खेचून त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला जाईल, अशा इशारा संघटनेचे नेते खासदार ओवैसी यांनी दिला आहे.
एमआयएमची भूमिका आक्षेपार्ह वाटत असेल, तर त्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे खुले आव्हान देत खासदार ओवैसी यांनी प्रणिती शिंदे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. परंतु त्यांच्या या इशाऱ्याला केराची टोपली दाखवत आमदार प्रणिती शिंदे यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले. आपण कोणत्याही समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. आपण केवळ एका पक्षाच्या धोरणाच्या विरोधात विधान केले. भगवा आणि हिरव्या वादामुळे तरुण पिढीची माथी भडकावली जात आहेत. आपण अखेर भारतीय आहोत. त्याचा विचार कधी करणार, असा सवाल करीत आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमची धोरणे देशाला व समाजाला तोडण्याचा प्रयत्न करणारी आहेत, अशी टीका केली. देशाच्या विरोधात कोणी बेजबाबदार वक्तव्य करीत असेल, तर त्यांच्या विरोधात आवाज उठवणार आणि अशा वक्तव्याचा निषेध नोंदवणारच. ओवैसी यांची माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी असे त्यांनी ठणकावून सांगितले.
सोलापुरात नुकताच साजरा झालेल्या मोहरम उत्सवात काही ताबुतांच्या तथा पंजांच्या मंडळांमध्ये आमदार प्रणिती शिंदे गेल्या असता त्यांच्या समोर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. शिंदे समर्थक व एमआयएएमचे कार्यकर्ते काही ठिकाणी एकमेकांसमोर भिडल्याच्याही घटना घडल्या. या पाश्र्वभूमीवर आमदार शिंदे व एमआयएम यांच्यातील वाद विकोपाला जाणार काय, याकडे सर्वाच्या नजरा वळल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debate on praniti shinde comment
First published on: 09-11-2014 at 02:20 IST