शालेय शिक्षणमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर यांनी आज (५ मार्च) दुपारी मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या शिंदे गटावरील टीकेला उत्तर दिलं. केसरकर म्हणाले, त्यांनी आम्हाला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तसे वागलो नाही.

शालेय शिक्षणंत्री म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी युतीचा धर्म पाळायला पाहिजे होता. आम्ही मात्र युतीधर्म पाळला. त्यामुळे आम्हाला त्यांच्या टीकेचं काही वाटत नाही. उबाठा गटाने आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, परंतु, आम्ही त्यांची बदनामी केली का? खरे बदनाम तर ते आहेत. परंतु, त्यांनी आम्हाला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांचे जे कोण राजपुत्र (आदित्य ठाकरे) वगैरे बोलतात, ते मुळात स्वतःकडे काय आहे ते बघून बोलत असतात. त्यांच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. नुकतीच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्या भेटीची सर्वांना माहिती आहे. ती भेट कशासाठी होती हे संपूर्ण जनतेला माहिती आहे.

हे ही वाचा >> “राहुलयान १९ वेळा फेल झाल्यामुळे…”, अमित शाहांचा राहुल आणि सोनिया गांधींवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपक केसरकर म्हणाले, मुळात आपण राजकीय निर्णय घेताना चुकायचं आणि नंतर मग नेत्यांच्या मागे जायचं. आपल्यावर एखादी केस (खटला) झाली तर आमच्यावर राजकीय हल्ला झाला असं बोलण्यापेक्षा वेळीच पथ्य पाळली असती तर बरं झालं असतं. परंतु, त्यांना पथ्य पाळता येत नाहीत असं मला वाटतं. आम्हाला कोणावर टीका करायची नाही. आम्हाला महाराष्ट्रातील जनतेच्या सुखासाठी काम करायचं आहे. अमित शाह आल्यावर एकमताने सगळे निर्णय होतील. आमच्यात (महायुतीत) एकी आहे. आज आमचं एकमेव उद्दीष्ट आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं आहे. ते विश्वनेते आहेतच, परंतु ते यापेक्षा अधिक उंचीवर गेले पाहिजेत. यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र राहिलं पाहिजे. भारत आघाडीवर राहिला पाहिजे. महाराष्ट्रदेखील आघाडीवर असला पाहिजे.