मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा मुंबईतील बिकेसी मैदानात पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे भाषण करताना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना डुलकी लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर शिवसेनेने दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता त्यावर दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यातील पत्रकार परिषेदत ते बोलत होते.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांसमोरच मोठी घोषणा, हात जोडून म्हणाले “मी लवकरच…”

काय म्हणाले दीपक केसरकर?

“एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी मला डुलकी लागल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, दसरा मेळाव्यात मी झोपलो नव्हतो, तर विचार करत होतो. मी झोपलो असतो, तर माझे हात कसे हलले असते?” असे स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिले. “जेवढा आदर मला उद्धव ठाकरेंबद्दल आहे, तेवढाच आदर मला एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आहे. मी उद्धव ठाकरेंबाबत काहीही बोलणार नाही. मात्र, त्यांनी आमच्या आमदारांबाबत आणि सरकारबाबात काहीही बोलले तरी मी उत्तर नक्की देईल”, असेही ते म्हणाले.

“तज्ञ शिक्षकांसोबत बैठक घेतली”

“पुस्तकांबरोबरच आता वह्या सुद्धा विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. लवकरच याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल”, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. “राज्यातील ८५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि मोफत पुस्तकांचा फायदा होईल”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ४२ कोटींचा उल्लेख करत नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंबद्दल खळबळजनक दावा! ‘खोके’ टीकेवरुन म्हणाले, “ते पैसे व्हाइट करण्याचं…”

“ती त्यांची भूमिका”

“आदिपुरूष चित्रपटावर बंदी घालण्याची राम कदम यांची मागणी ही त्यांची व्यक्तीगत भूमिका आहे. चित्रपटांवर बंदी घालायची की नाही, हे ठरवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहेत. गृहमंत्री त्याबद्दल निर्णय घेतील”, असेही ते म्हणाले.