राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज बारसूतील रिफायनरी विरोधक आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. तसेच जबरदस्तीने हा प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या कोकण दौऱ्यावर आता शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी जोरदार टीका केली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत त्यामुळे…” बारसूमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

काय म्हणाले दीपक केसरकर?

“कोकणात रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि येथील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, ही शिंदे-फडणवीस सरकारची भूमिका आहे. मात्र, राजापूरमध्ये जाऊन उद्धव ठाकरे विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ विरोध करायचा म्हणून त्यांचा विरोध सुरू आहे”, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली.

हेही वाचा – “तीन जिल्ह्यांत कोणी ओळखत नव्हतं, आता गद्दारीची नोंद…”; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

“उद्धव ठाकरेंनी स्वत: बारसूतील जागेची शिफारस केली होती. याबाबत त्यांनी केंद्र सरकारला पत्र दिलं होतं. त्यामुळे आधी मागणी करायची आणि नंतर त्यालाच विरोध करायचा, असा प्रकार महाराष्ट्रात प्रथमच होतो आहे. उद्धव ठाकरेंच्या याच कार्यपद्धतीवर शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्र्यात लिहिलं आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – आठ दिवसांपूर्वी प्रकल्पांचं समर्थन करणाऱ्या राजन साळवींची भूमिका का बदलली? उद्धव ठाकरे म्हणाले…

उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आज राजापूरमध्ये जाऊन स्थानिकांशी चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. “लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे. मात्र, बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू”, असे ते म्हणाले. तसेच “आज मी कोकणात ‘मन की बात’ करायला आलेलो नाही, तर ‘जन की बात’ ऐकायला आलो आहे. शिवसेना ही बारसूतील लोकांच्या पाठिशी आहे. जर येथील लोकांना रिफायनरी नको असेल तर काहीही झालं तरी इथे रिफायनरी होऊ देणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला.