राज्यातील सत्तासंघर्षात रोज नवे धक्के समोर येत आहेत. शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय दिला. ‘शिवसेना’ हे पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. यानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यानंतर शिवसेना भवन, शाखा आणि पक्षाच्या निधीवर शिंदे गटाकडून दावा करण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, “शिवसेना भवन, शाखा आणि पक्षाचा निधी आम्ही ताब्यात घेणार आहोत, असा गैरसमज पसरवला जात आहे. हे केवळ सहानुभूमती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. आम्हाला काही नको, फक्त आम्ही बाळासाहेबांचं विचार घेऊन जायचं आहे. पण, शिवसैनिकांचं पैसे स्वत:च्या नावावर वळवणं चुकीचं आहे. पक्षनिधी सर्व शिवसैनिकांना द्यावा,” अशी मागणी दीपक केसरकारांनी केली आहे.

हेही वाचा : “लिमिटेड डिक्शनरी वापरणाऱ्यांना..” अमित शाह यांना मोगॅम्बो म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

“सहानुभूती निर्माण करणं, आता बस झालं. आम्ही सहा महिन्यात काय केलं ते दाखवतो. तुम्ही अडीच वर्षात काय केलं ते दाखवा. संजय राऊत जेलमधून बाहेर आल्यापासून बेजबाबदारपणे बोलत आहेत. जामीन मिळताना दिलेल्या अटींचं ते उल्लंघन करत आहेत. त्यामुळे आम्ही ईडी न्यायालयाला विनंती करणार आहोत,” असं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : शंभुराज देसाईंचा संजय राऊतांवर हल्लाबोल; ‘त्या’ आरोपांवर बोलताना म्हणाले “…म्हणूनच त्यांच्या बोलण्यात ताळमेळ नाही”

“शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्यांना व्हीप पाळावा लागेल. जे व्हीप पाळणार नाहीत, त्यांच्यावर कायद्याने कारवाई होणार आहे. ज्यांना चुकीचं वाटतं, त्यांनी न्यायालयात जावा,” असा सल्ला दीपक केसरकरांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अप्रत्यक्षपणे दिला आहे.