New Parliament Building Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. परंतु कार्यक्रमाला विरोधी पक्ष उपस्थित नाहीत. देशातल्या तब्बल २० विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. विरोधी पक्ष नसल्याने हा कार्यक्रम अपूर्ण असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. तसेच तुम्हाला या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं का? असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तीन दिवसांपूर्वी मला फक्त एक व्हॉट्सअॅप मेसेज आला होता, संसदीय कमिटी मेंबर म्हणून तो मेसेज होता. एखाद्या नेत्याने किंवा मंत्र्याने एक फोन केला असता तरी आम्ही सर्वजण या कार्यक्रमाला गेलो असतो.
दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याला शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दीपक केसरकर म्हणाले आपण ज्या सदनात बसतो ते देशातलं सर्वोच्च सदन आहे. त्याचं उद्घाटन आहे हे सगळ्यांना माहिती होतं. त्यामुळे या उद्घाटनाच्या आमंत्रणाची वाट बघत राहणं हे लोकशाहीला धरून नाही. आमंत्रणाची वाट बघण्यापेक्षा विरोधी पक्षांनी कार्यक्रमाला जायला हवं होतं.




मंत्री दीपक केसरकर म्हणाले, संसदेच्या नव्या इमारतीचं आज उद्घाटन आहे हे सगळ्यांना माहिती होतं. परंतु हे यांचे राजकीय डावपेच आहेत, जे लोकशाहीला धरून नाहीत.
हे ही वाचा >> “बालाजी किणीकर म्हणतायत काहीही करून मला मातोश्रीवर न्या!”, जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा दावा
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशाची संसद चालवायची सर्व जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. पार्लमेंट ट्रेजरी बेंचद्वारे सगळा कारभार चालतो. खासदारांची बिलं पास करताना किंवा सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमांसाठी केंद्रातले मंत्री नेत्यांना, विरोधकांना फोन करतात. यांची कामं असतात तेव्हा हे फोन करतात. परंतु आजच्या कार्यक्रमाला बोलावण्यासाठी कोणाचाही फोन आला नाही. या सरकारमधल्या एखाद्या वरिष्ठ नेत्यांने अथवा मत्र्यांने सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना एक फोन केला असता तरी आम्ही सर्वजण राजीखुशीने या कार्यक्रमालो गेलो असतो.