शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनीदेखील त्यांच्या पातळीवर हा प्रयत्न केला. मात्र त्यांना यामध्ये यश आले नाही. दरम्यान, मागील काही दिवसांपासून दीपाली सय्यद नाराज आहेत, असे म्हटले जात आहे. याच कारणामुळे त्या शिंदे गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला जातोय. या सर्वच प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आहेत. एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर त्या माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

हेही वाचा >> “जयंत पाटलांच्या घरावर भाजपाचा झेंडा लागणार”, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत खळबळ

काही गोष्टींसाठी नियोजन आखावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो. या गोष्टी कृतीतूनच लोकांपर्यंत पोहोचू शकतात. मागील काही दिवसांपासून मी त्याच कामात होते. लवकरच ते लोकांपर्यंत पोहोचेल. प्रत्येकजण आपापले काम करतो. माझी कोणावरही नाराजी नाही. प्रत्येकजण आपली जागा स्वत:च्या कर्तृत्वाने मिळवत असतो. त्यामुळे मी नाराज नाही, असे दीपाली सय्यद यांनी स्पष्टपणे सांगितले.

हेही वाचा >> उद्धव ठाकरे गटातील बडा नेता नाराज? गिरीश महाजन यांच्या विधानानंतर चर्चेला उधाण!

मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती. भविष्यातही त्यांनी एकत्र यावे, असे मला वाटते, असेही दीपाली सय्यद यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या दौऱ्याला यश मिळो. माझ्या शुभेच्छा असतील. त्यांनी अगोदरच या दौऱ्यांना सुरुवात करायला हवी होती. माझे पदाधिकारी किती मजबूत आहेत, हे नेत्याने तपासले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे केले असते, तर शिवसेना पक्षात फूट पडली नसती, असेही दीपाली सय्याद म्हणाल्या.

हेही वाचा >> मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे, एकनाथ शिंदे, फडणवीस एका मंचावर, किशोरी पेडणेकर म्हणाल्या “मी नेहमीच म्हणते की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझा आवाज मातोश्रीपर्यंत जाण्यापासून रोखणारे बरेच लोक होते. आगामी काळात नक्कीच त्यांची नावे सांगेन. काही काम करायचे असेल तर आता आम्ही थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो. आम्ही ते काम मुख्यमंत्र्यांना सांगतो. त्याची पुढे अंमलबजावणीही होते. ते खूप महत्त्वाचे आहे, असे दीपाली सय्यद म्हणाल्या.