कोल्हापूर : भारताच्या इथेनॉल धोरणाने उसाचा रस आणि मोलॅसेसपासून इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळून साखर उद्योगाचा कायापालट केला आहे. ऊस शेतकऱ्यांना हमीभावाची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
बिद्री (ता. कागल ) साखर कारखान्याच्या सुमारे १३८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली फित कापून केले.
यावेळी पवार म्हणाले, देशांतर्गत इथेनॉलचे उत्पादन करून भारताने आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी केल्याने मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची बचत झाली आहे. इथेनॉल हे पेट्रोलच्या तुलनेत स्वच्छ इंधन असल्याने हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते. ऊस शेतकऱ्यांना उत्पन्न स्थिरता येऊन वेळेवर पैसेही मिळतात. साखर कारखान्यात इथेनॉल तयार केल्याने मोलॅसेसचा योग्य वापर, आर्थिक लाभ, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांचा फायदा असा चौफेर उपयोग होतो, असे कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले.
यावेळी आमदार सतेज पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार संजय घाटगे, कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, प्रादेशिक साखर सहसंचालक जी. जी. मावळे, कार्यकारी संचालक के. एस. चौगुले, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.