विधानसभेचा तिसरा दिवसही कोराच
सिंचन घोटाळ्याची विशेष तपास पथक(एसआयटी)मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरीत विरोधी पक्षांनी गुरुवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी केली. त्यामुळे दोन्ही सभागृहांत सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. दुसरीकडे काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेचे सदस्य मात्र यावेळी गप्प बसून होते. या गोंधळात अवघ्या पाऊण तासातच विधानसभेत दिवसभराचे कामकाज उरकण्यात आले. त्यामुळे राज्यातील कोणत्याही प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही.
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या दोन दिवसांपासून या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आम्ही करीत असून त्यावर सरकारची काय भूमिका आहे, असा सवाल त्यांनी केला. तर सिंचनाच्या घोटाळ्यांवर सभागृहात आतापर्यंत २८ वेळा चर्चा झाली असून प्रत्येक वेळी सरकारने तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे आता एसआयटीमार्फतच चौकशी झाली पहिजे, अशी मागणी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी मात्र सभागृहात चाललेल्या गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त केली. गेले चार दिवस सभागृहाचे कामकाज झाले नाही. विदर्भातील प्रश्नांबाबत सभागृहातून काही ठोस हाती पडेल अशी या भागातील लोकांची अपेक्षा आहे. सभागृहाचे कामकाज चालावे, अशी सामान्य माणसाचीही भावना आहे. त्यामुळे सिंचनावरील चर्चेदरम्यान एसआयची चौकशीची घोषणा करण्याची हमी सरकारने द्यावी आणि विरोधी पक्षानेही कामकाज सुरू करावे अशी सूचना नांदगावकर यांनी केली.
मात्र नियमानुसार सभागृहात सिंचनाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याची संधी असतानाही, विरोधकांनी आज भारनियमनाच्या प्रश्नावर चर्चा केली आहे. सर्व विरोधी पक्षांमध्ये सिंचनावर चर्चा करण्याचा निर्णय झाला असतानाही भाजपने तो ऐनवेळी बदलला. त्यामुळे विरोधकांना चर्चाच करायची नसल्यामुळे गोंधळ घालून कामकाज बंद पाडले जात असल्याचा आरोप गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला. तर विरोधकांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळेच सगळा पोरखेळ सुरू असून सदनाचा वेळ फुकट घालविला जात असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केला. एसआयटी चौकशीची मागणीही त्यांनी फेटाळून लावली. राष्ट्रवादीचे सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयजयकाराच्या तर भाजपाचे आमदार पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. अन्य पक्षांचे आमदार मात्र हा सगळा गोंधळ हताशपणे पाहत होते.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2012 रोजी प्रकाशित
सिंचन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्र्यांची पुन्हा कोंडी
सिंचन घोटाळ्याची विशेष तपास पथक(एसआयटी)मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरीत विरोधी पक्षांनी गुरुवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी केली. त्यामुळे दोन्ही सभागृहांत सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. दुसरीकडे काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेचे सदस्य मात्र यावेळी गप्प बसून होते. या गोंधळात अवघ्या पाऊण तासातच विधानसभेत दिवसभराचे कामकाज उरकण्यात आले. त्यामुळे राज्यातील कोणत्याही प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही.
First published on: 14-12-2012 at 03:44 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister conrnered on irrigation scam issue