दापोली :ज्यांनी स्वतः भ्रष्टाचार केला, तेच आज इतरांवर आरोप करत आहेत. जर दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले आहेत, तर आता त्यांना काय म्हणायचं ?” असा प्रश्न उपस्थित करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते खेड शहरातील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड मध्ये आलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विकासकामांमध्ये विलंब होणार नाही, निर्णय लगेच घेतले जातील आणि निधी तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल. मी निधी वाटप करताना कधी हात आखडता घेतलेला नाही. ‘नो रिझन – ऑन द स्पॉट डिसिजन’ हे माझे काम करण्याचे तत्त्व आहे,” असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मूळ विचारांची पुर्न:स्थापना करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे आपण चाललो आहोत. केवळ सत्तेसाठी काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना मुक्त करण्यासाठी आम्ही उठाव केला आणि जनतेनेही तो स्वीकारला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महायुतीला २३२ जागा मिळाल्या. यामागे माझ्या लाडक्या बहिणी, शेतकरी, जेष्ठ नागरिक यांनी आमच्या कामावर दाखवलेला विश्वास आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले की, योगेश कदम यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे. कोणत्याही अफवांमुळे गोंधळून जाऊ नका. शिवसेना आणि सरकार दोन्ही खंबीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी मंत्री भरत गोगावले, मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, माजी आमदार सदानंद चव्हाण, अशोक पाटील, संजय कदम, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अरुण कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांच्यासह खेड, दापोली व मंडणगड येथील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
1 स्व. मिनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, मंत्री भरत गोगावले सोबत अन्य मान्यवर.
2.स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचे लोकार्पण करताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व अन्य मान्यवर.