मुंबई : मुंबई महापालिकेची सुमारे २०-२५ वर्षे सत्ता सांभाळणाऱ्यांच्या कानावर मराठीचा आक्रोश कधी पडला नाही का, आता मराठी माणसासाठी गळे काढणाऱ्यांंनीच अमराठी कंत्राटदार, विकासकांसाठी मित्रांच्या माध्यमातून स्व:ताचे भले करुन घेतले. त्यामुळे आमच्याकडे बोटे दाखविण्यापूर्वी मराठी माणूस कुणामुळे मुंबईबाहेर फेकला गेला याचे आधी आत्मपरिक्षण करा टोला लगावतानाच मुंबईतीला तोडण्याचे नाही तर जगाशी जोडण्याचे काम सरकार करीत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी केला.

विरोधी पक्षाच्या वतीने राज्यातील नागरी प्रश्न, घरांचे प्रश्न तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील समस्यांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी आपल्या तासभराच्या भाषणात मुंबईतील विकासकांमाचा पाढा वाचत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम करत आहोत. सरकारने गेल्या अडीच तीन वर्षात केलेल्या प्रयत्नांमुळे मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील तसेच झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने नव्हे तर न्यायालयाच्या आदेशामुळे लांबल्या असून आता निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुका पार पडतील असे सांगून शिंदे म्हणाले, मुंबईत मराठी माणसांसाठी गळे काढणाऱ्यांनी मुंबई बाहेर मराठी माणूस कोणामुळे फेकला गेला याचे आत्मपरिक्षण करावे. अमराठी ठेकेदार कंत्राटदारांकडून कोणी कोट्यावधी रुपयांची माया गोळा केली याचा लेखाजोखा आपल्याकडे आहे. तसेच पर्यावरणाचे रक्षण बोलून नाही तर करुन दाखवावे लागते. मतदानाच्या आधी मी आणि तू आणि निवडणुकीनंतर कोण रे तू अशी आमची भूमिका नसल्याचा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला.

मुंबईसाठी सर्वाधिक काम महायुती सरकारच्या काळात झाली आहेत. ही कामं मुंबईकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईचा सर्वात मोठा विकास आम्ही करतोय. मुंबईचा सर्वार्थाने कायापालट केला जात असल्याचे सांगताना, वरळीच्या बीडीडी चाळीतील ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्टपर्यंत करण्याची घोषणा शिंदे यांनी केली. रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देताना, मोतीलाल नगर गोरेगाव, जीटीपी नगर येथे समूह विकास प्रकल्पासाठी विकासकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ४९०० रहिवाशांना घरे मिळणार आहेत. कामाठीपुरा अभ्युदयनगर इथल्या समुह विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून सप्टेंबर २०२५पर्यंत ती पूर्ण होईल. ११ हजार ४११ भाडेकरूंना पुनर्विकासाचा लाभ होणार आहे. आदर्शनगर वरळी आणि वांद्रे रिक्लेमेशन येथे क्लस्टरचा लाभ २०१० रहिवाशांना होणार आहे त्याचीही निविदा प्रक्रिया सुरू आहे. वरळी नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. त्यामध्ये एकूण १५ हजार ६०० भाडेकरूंचे पुनर्वसन होणार आहे. त्यापैकी वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्टपर्यंत करणार आहोत. एकूण २५ टक्के सदनिकांचे वाटप डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

गिरणी कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले असून १ लाख ७४ हजार १७२ गिरणी कामगारांची नोंद झाली. आत्तापर्यंत १३ हजार १६१ गिरणी कामगारांना घरे दिली आहेत. गिरणी कामगारांना परवडणारी घरे योजनेतून घरे उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी हौसिंग स्टॉकही वाढवला जाईल. त्यासाठी नियमात बदलही केले जातील,अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे धारावीकरांचे जीवनच बदलून जाणार आहे. हा पुनर्विकास फक्त पायाभूत सुविधांचा नाही, तर रोजगार, शिक्षण, आरोग्य, आणि सामाजिक सलोख्याचं मॉडेल ठरेल. हे ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल आहे. धारावीतील लोकांना चांगली घरे मिळायला हवीत त्यामुळे लोकांनीच आपले हित ओळखावे असे आवाहनही त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने झोन निहाय समर्पित एजन्सी नेमून खड्डे तक्रारीवर कार्यवाही केली जात आहे. दरवर्षी खड्डे भरण्यासाठी जेवढा खर्च लागतो तो यावर्षी ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी ऑनलाईन पोर्टल त्याचबरोबर तपासणीसाठी मुंबई आयआयटी सोबत करार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.