मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस मला एन्काउंटरच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा जरांगेंनी केलाय. यावरच आता फडणवीस यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय. जरांगेंनी केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मात्र कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल, असे फडणवीस म्हणाले. ते आज (२५ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“सागर बंगल्यावर कोणीही येऊ शकतं”

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, सागर बंगला हा सरकारचा आहे. सरकारी काम घेऊन कोणीही या बंगल्यावर येऊ शकतो. मनोज जरांगे हे कोणत्या निराशेतून बोलत आहेत. त्यांना कोणती सहानुभूती घ्यायची आहे, याची मला कल्पना नाही. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ते धादांत खोटं बोलत आहेत. मराठा आरक्षणासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला माहिती आहे. आजचा सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा विद्यार्थी, तरुणांसाठी आशेचं स्थान आहे. त्याची सुरुवात मी केलेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांत वाढ केलेली आहे.

“कोणाच्या म्हणण्यावर मराठा समाज…”

“मराठा आरक्षण मी उच्च न्यायालयात टिकवलेलं आहे. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकवलं. माझं मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर ज्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी होती, ते मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवू शकलेले नाहीत. त्यामुळे कोणाच्या म्हणण्यावर मराठा समाज विश्वास ठेवेल हे माणणाऱ्यांत मी नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल”

मनोज जरांगे यांना खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फूस आहे, असा अप्रत्यक्ष आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, मनोज जरांगे जी स्क्रिप्ट बोलत आहेत, तीच स्क्रिप्ट याआधी उद्धव ठाकरे बोलत होते. ज्या स्क्रिप्टवर शरद पवार बोलत होते, नेमके तेच विषय मनोज जरांगे मांडत आहेत. त्यांनी हेच विषय का मांडावेत असा प्रश्न मला पडला आहे. याच कारणामुळ जरांगेंच्या पाठीशी कोण आहे, याची काहीशी कल्पना आमच्याकडे आहे. योग्य वेळी ती बाहेर येईल. तुर्तास एवढंच आहे की कायदा, सुव्यवस्था न बिघडवता कोणीही आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही. मात्र कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल.