अलिबाग – लाचखोरीच्या प्रकरणात पेण येथील महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याला पकडण्यात आले आहे. संजय प्रदीप जाधव असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
खालापूर येथील एका इसमाने आपल्या जागेतील महावितरणच्या उच्चदाब वाहिन्या दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी अर्ज केला होता. हे काम करून घेण्यासाठी जमीन मालकाने, शक्य एंटरप्रायझेस नामक कंपनीला अधिकारपत्र दिले होते. यासाठी सदर कामाचा तांत्रिक परवाना महावितरणच्या पेण सर्कल येथील कार्यालयात प्रलंबित होता. हा परवाना लवकर मिळावा यासाठी जमिन मालकांनी विनंती अर्ज दाखल केला होता. यासाठी संजय जाधव तांत्रिक परवाना देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ७ जुलै २०२५ रोजी तक्रार नोंदवली होती या तक्रारीची पंचासमक्ष ८ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत उप कार्यकारी अभियंता जाधव यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि जाधव यांना पाच हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. दुपारी साडेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उप अधिक्षक धर्मराज सोनके, पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ, पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, विशाल अहिरे, प्रमिला विश्वासराव, उमा बासरे, निखिल चौलकर, योगिता चाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.