जालना : मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगून आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाबाबत बोलताना जरांगे यांनी हे प्रकार आंदोलनास गालबोट लावणारे असल्याचे सांगत असे करणाऱ्यांना मराठा समाज सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे.उपोषणाच्या सहाव्या दिवशी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, की राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संपर्क केला होता. त्या वेळी आपण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश द्या, असे त्यांना सांगितले. मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या संदर्भात पंतप्रधानांशी बोलले किंवा नाहीत याचे उत्तर आलेले नाही. याचा अर्थ केंद्र सरकारला तुम्ही याबाबत काही सांगितले नाही, असा होतो.
पुरावे असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्याऐवजी सर्व मराठा समाजास द्या. यासाठी मुख्यमंत्र्यांना आणखी किती वेळ हवा आहे, ते कळू द्या. १ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. हिंसक घटना पाहता आमच्या आंदोलनास कोणी तरी गालबोट लावत आहे. कोणी वाटेला गेले तर मराठा समाज त्यास सोडणार नाही. आमचे पुढील आंदोलन शांततेत परंतु अवघड असेल. आम्हाला अर्धवट आरक्षण नको आहे, असेही ते म्हणाले.दरम्यान, उपोषणाच्या सहाव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावली होती. जरांगे यांनी किमान पाणी तरी प्यावे, अशी विनंती केल्यावर त्यांनी पाणी घेतले.
हेही वाचा >>>मनोज जरांगे पाटील यांना नवनीत राणांचा पाठिंबा, म्हणाल्या; “जे लढा देण्यावर विश्वास ठेवतात….”
वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
राज्यात पुन्हा नव्याने सुरु झालेल्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलानाल वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना आंबेडकर यांनी पत्र पाठविले असून, त्यांना आपला जीव संभाळण्याचे कळकळीचे आवाहनही केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे की, गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण पुढाकार घेऊन मोठे आंदोलन उभे केले आणि प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात समाजात जागृती निर्माण केली आहे.
आमदार अशोक पवार यांचे आंदोलन
शिरूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनास शिरूर तालुक्यातून मोठा पाठिंबा मिळत असून, गावोगावी उपोषण आणि दुचाकी फेरीचे आयोजन केले जात आहे. आमदार अॅलड. अशोक पवार यांनी जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी अन्नत्याग आंदोलन केले. वडगाव रासाई येथे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी दोन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून, आमदार अशोक पवार यांनी सोमवारी अन्नत्याग आंदोलन केले.
हेही वाचा >>>बीडमध्ये उद्रेक, आंदोलकांकडून ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना; अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू
गोडसे यांचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा
मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा पाठवला आहे.
आरक्षणाला विरोध करणाऱ्या तरुणाला सोलापुरात मारहाण
सोलापूर : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्यांला येथे रस्त्यावर अडवून त्याच्या अंगावर काळे तेल टाकण्यात आले आणि त्याला उठाबशा काढायला लावून माफी मागण्यास भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी या तरुणाला अडवून आरक्षणाला विरोध का करता म्हणून जाब विचारला. या वेळी त्यांच्याशी वाद सुरू असतानाच अचानकपणे त्यांच्या संपूर्ण अंगावर काळे तेल ओतण्यात आले. काहींनी तरुणास मारहाण केली.