मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; ‘अभियानात लोकसहभागाची गरज’
‘नमामि चंद्रभागा’ अभियानासाठी प्राधिकरण स्थापन करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली. येथील चंद्रभागा नदी स्वच्छ व निर्मल करून पूर्वीचे वैभव प्राप्त करून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नमामि चंद्रभागा अभियानात लोकसहभागाची गरज आहे, असे मत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.
येथील सिंहगड महाविद्यालयात ‘नमामी चंद्रभागा परिषदेचे’,आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह आदी उपस्थित होते. या परिषेदत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी चांगला उपक्रम हाती घेतला आहे. चंद्रभागा नदीला मोठा इतिहास आहे. लाखो वैष्णव या नदीच्या तीरावर आले आहेत. ही नदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या नदीच्या उगमापासून ते चंद्रभागेपर्यंत पाणी अविरत वाहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांचे याकामी योगदान लाभणार आहे. हे अभियान राबविताना ते वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे.’ इथे येणाऱ्या भाविकाला केवळ नदीचे पाणी स्वच्छ न देता त्याचबरोबर इतर सुविधाही देणार आहे. यासाठी लवकरच एक कृती आराखडा तयार केला जाईल आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, रुख्मिणीमाता ही विदर्भातील आहे. त्यामुळे सासर या नात्याने आम्ही कमी पडणार नाही. नमामि चंद्रभागा हे अभियान हे वेळेत पूर्ण करू. यावेळी निरी, वन, एम.जे.पी., साबरमती सी.फौंडेशन यांनी माहिती सादर केली. नमामि चंद्रभागासाठी आता लोकसहभागाची गरज आहे. नदी परिसर आणि नदीकाठ प्रदूषित होणार नाही याकडे गावकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. नदीचे पावित्र्य राखण्यासाठी पुढे आले पाहिजे. नदीमध्ये अस्वच्छ पाणी मिसळू नये या बाबत सरकारने कडक पावले उचलावीत. तसेच याबाबत एक परिषद आयोजित करावी, या माध्यमातून जनजागृती होईल, असे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी या परिषदेत सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2016 रोजी प्रकाशित
‘नमामि चंद्रभागा’साठी प्राधिकरण स्थापणार
मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; ‘अभियानात लोकसहभागाची गरज’
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-06-2016 at 01:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis announcement about chandrabhaga river