महाराष्ट्रातील शिवसेनेचे अंतर्गत संकट रोज नवे राजकीय वळण घेत आहे. शिवसेना सरकारपेक्षा आपला पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच आता भाजपाही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्याची माहिती  समोर आली आहे. मात्र भाजपाने या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वडोदरा येथे भेट झाल्याचे म्हटले जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे यांची वडोदरा येथे भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे त्यावेळी गृहमंत्री अमित शाहदेखील वडोदऱ्यात असल्याची चर्चा होती. शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे गुवाहाटीने वडोदराला रवाना झाले होते. अमित शाह आणि फडणवीसांची भेट घेऊन शनिवारी सकाळी ६.४५ ला एकनाथ शिंदे गुवाहाटीला परतल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेतील बंडखोर गटाने दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करूनही भाजपाकडून अद्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, देशात केवळ भाजपाच हिंदुत्ववादी पक्ष असावा दुसरा नको अशी त्याच्या नेत्यांची भूमिका आहे. त्यातूनच शिवसेना संपवण्याचे कारस्थान रचले आहे. आपल्याच काहींनी भाजपाला साथ देत पाठीत खंजीर खुपसला आहे, पण मी शिवसेना पुन्हा उभी करेन, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला होता.

एकनाथ शिंदे यांच्यासह १६ जणांना अपात्रतेची नोटीस

दरम्यान, पक्षादेश बजावूनही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल शिवसेनेने केलेल्या अर्जानुसार विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील १६ आमदारांना अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस बजाविली आहे. या सर्वाना सोमवारी सायंकाळपर्यंत उत्तर देण्यास मुदत देण्यात आली आहे. या नोटिशीमुळे शिवसेना व शिंदे गटात आता कायदेशीर लढाईला प्रारंभ झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे यांनी बंड पुकारल्यावर शिवसेना विधमंडळ पक्षांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षादेश लागू केला होता. या बैठकीला उपस्थित नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात शिवसेनेने पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार अपात्र ठरवावे म्हणून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर विधानसभा उपाध्यक्षांनी नोटिसा बजाविल्या आहेत.