पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ममता बॅनर्जींच्या दौऱ्यावरून भाजपाकडून टीका केली जात असताना शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. तसेच, काँग्रेसविषयी ममता बॅनर्जींनी केलेल्या विधानावर काँग्रेसकडून देखील आक्षेप घेतला जात असताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, शिवसेनेचा स्ट्राईकरेट हा आमच्यापेक्षा कमी होता, अशी आठवण देखील फडणवीसांनी संजय राऊत आणि शिवसेनेला करून दिली आहे.

“इतक्या मोठ्या बाता करताय, किती निवडून आले?”

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यावरून संजय राऊतांनी अनेकदा भाजपावर निशाणा साधला आहे. आज देखील पश्चिम बंगालच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपावर टीका केल्यानंतर त्यावर फडणवीसांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊत इतक्या मोठ्या बाता करतायत, त्यांचे किती निवडून आले? ५६ निवडून आले आहेत. त्यांचा ४०-४२ टक्के असा पासिंग स्ट्राईकरेट होता. आमचा ७० टक्के होता. त्यामुळे कुणाला महाराष्ट्रातल्या लोकांनी पळवून लावलं हे निवडणुकीतून स्पष्ट झालंय, ते पुढच्या निवडणुकीतही स्पष्ट होईल”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

“त्यांनी कितीही लांगुलचालन केलं, तरी..”

दरम्यान, भाजपाविरोधी विरोधकांची आघाडी करण्याच्या प्रयत्नांवर आणि शिवसेनेच्या त्याला समर्थनावर देखील फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं. “मला वाटतं की संजय राऊत असतील किंवा शिवसेना असेल, यांनी कितीही लांगुलचालन केलं, तरी त्यांना फायदा होणार नाही. पण एक चांगलंय. आता मतांच्या लाचारीमध्ये त्यांना हिंदुत्वविरोधी पक्षांना डोक्यावर घेऊन हिंडावं लागतं, हा त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

ममतांच्या मुंबई दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्या भाजपा नेत्यांना राऊतांनी सुनावलं; म्हणाले “तुम्हाला जुलाब का सुरु झालेत हे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांका चतुर्वेदींच्या विधानावरून निशाणा

“माफी मागायला मी सावरकर नाही”, या शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या विधानावरून देखील फडणवीसांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. “शिवसेनेचं बेगडी सावरकर प्रेम आता पूर्णच उघड झालं आहे. आत्तापर्यंत त्यांच्या मित्र पक्षाचे लोक रोज सावरकरांना शिव्या द्यायचे. आता त्यांचे खासदार असं म्हणतायत. सावरकरांना भारतरत्न नका देऊ, ते पर्मनंट भारतरत्न आहेत. पण किमान त्यांचा अपमान करू नका. यातून त्यांचं बेगडी प्रेम लक्षात येतंय आणि जनतेला ते मान्य नाही”, असं ते म्हणाले.