राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिकठिकाणी सत्तारांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अब्दुल सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेत मविआतील नेत्यांनी या सगळ्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांच्या मौनावर आक्षेप घेतला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चेंबूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना ते बोलत होते.

नेमकं काय घडलंय?

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून विरोधकांकडून ‘खोके सरकार’ म्हणून या सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भातच सुप्रिया सुळेंनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली होती. “त्यांना खोके मिळाले, म्हणूनच ते खोके देऊ करत आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. “इतकी भि***झाली असेल सुप्रिया सुळे, तर तिलाही देऊ”, असं अब्दुल सत्तार म्हणाले. यावर राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

“आमचा या विधानाला विरोधच”

दरम्यान, यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी चेंबूरमध्ये बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे. “कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नयेत. ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही त्याचा विरोधच करू. पण जसं आमच्याकडच्यांना ते लागू आहे, तसंच ते त्यांच्याकडच्यांनाही लागू आहे. पण मला आज त्याच्यात जायचं नाहीये”, असं फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्रात राजकारणाची ही पातळी असू नये”

“मला वाटतं की राजकारणात आचारसंहिता पाळली गेली पाहिजे. अब्दुल सत्तार जे बोलले, त्याचं कोणतंही समर्थन मी करणार नाही. ते चूकच आहे. पण त्याचवेळी खोके आणि काय काय उलटसुलट बोलणं हेही चुकीचं आहे. हेही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे. पातळी खाली चालली आहे. राजकारणाची ही पातळी महाराष्ट्रात असू नये”, असंही फडणवीस म्हणाले.

“क्रियेवर प्रतिक्रिया असते”, अब्दुल सत्तार प्रकरणावरून चित्रा वाघ यांचं विरोधकांवर टीकास्र; म्हणाल्या, “मग संजय राऊतांवर…!”

“जोपर्यंत मोठे नेते आपापल्या लोकांना हे सांगत नाहीत, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. नाहीतर नेत्यांनी वेगळं बोलायचं आणि नंतर त्यांच्या लोकांनी बोलल्यावर त्याचं समर्थन करायचं असं करणं योग्य होणार नाही. त्यामुळे सगळीकडच्या नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे”, अशी सूचक प्रतिक्रियाही फडणवीसांनी यावेळी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हर हर महादेव’ चित्रपट वादावर फडणवीस म्हणतात…

‘हर हर महादेव’ या चित्रपटातील दृश्यांवर जितेंद्र आव्हाड आणि संभाजी ब्रिगेडकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपावर फडणवीसांनी भूमिका मांडली. “कुणालाही विरोध करायचा असेल, तर लोकशाही मार्गाने विरोध करावा. त्यासाठी त्यांना पूर्ण परवानगी आहे. मी चित्रपट पाहिलेला नाही. काय वाद आहे, हे मला माहिती नाही. कुणाला काही आक्षेप असतील, तर ते सनदशीर मार्गाने मांडावेत. सिनेमागृहात शिरून तिथल्या लोकांना मारहाण करणं, दादागिरी करणं हे सहन केलं जाणार नाही”, असं ते म्हणाले.