लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. यावेळी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीत अजित पवार गटाला विधानसभेला किती जागा देण्याचा शब्द देण्यात आला? याबाबत सांगत ८० ते ९० जागा देण्याचा शब्द देण्यात आला असल्याचं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असून भाजपाला जास्त जागा मिळतील, असं प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“विधानसभेच्या निवडणुकीत कोणी किती जागा लढवायच्या यासंदर्भात तिनही पक्षाचे नेते एकत्रित बसतील. योग्य तो फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तिनही पक्षाला जागा मिळतील. भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपाला सर्वाज जास्त जागा मिळतील. मात्र, आमच्याबरोबरचे जे दोन पक्ष (राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट) आहेत, त्यांचा पूर्ण सन्मान यामध्ये राखला जाईल”, अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा : “…म्हणून २००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”, सुधाकरराव नाईकांचा उल्लेख करत अजितदादांनी सांगितली पवारांची भीती

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

“आता एक निवडणूक झाली. यापुढे महायुतीमध्ये आपल्याला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हा त्यांनी आपल्याला ८० ते ९० जागा मिळतील असं सांगितलं होतं. यावेळेला (लोकसभेला) जी खटपट झाली ती खटपट पाहाता पुढे अशी खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे. हे आपल्याला त्यांना (भारतीय जनता पार्टीला) सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५०, ६० निवडून येतील. अन्यथा तुमच्या ५० आहेत, मग ५० घ्या. मग त्यातून पुन्हा किती निवडून येणार?”, असं छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबईतील मेळाव्यात बोलताना म्हटलं होतं.

पोर्श कार अपघात प्रकरणावर फडणवीसांचं भाष्य

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार करण्यात आल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना पोलिसांनी आज सकाळी अटक केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पुण्यातील अपघाताची जी घटना घडली ती गंभीर आहे. पोलिसांनी योग्य तपास केल्यामुळे आणि जे काही सीडीआर काढले त्यातून लक्षात आलं की, याच्यामध्ये गडबड आहे. त्यामुळे त्याचे धागेदोरे मुळापर्यंत जावून काढले. त्यानंतर लक्षात आलं की, अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताचे नमूने बदलण्यात आले होते. त्याच्या रक्ताच्या नमून्याऐवजी दुसरे नमूने घेण्यात आले होते. मात्र, आधीच त्याचे दुसरे नमूने पोलिसांजवळ असल्यामुळे त्याचा पर्दाफाश करण्यात आला. यामध्ये ज्या डॉक्टरांचा सहभाग होता. त्यांनाही अटक करण्यात आली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.