Devendra Fadnavis On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखील मराठी समाजाचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचा आज अखेर शेवट झाला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी सरकारने मान्य केल्यानंतर पाच दिवासंनंतर मनोज जरांगे यांनी आज आपले उपोषण सोडले. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांच्याकडून वारंवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली होती. यााबबत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या टीकेवर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की,”सातत्याने राजकारणात टीका सहन करावी लागते आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात. जेव्हा टीका झाली त्याहीवेळेस मी विचलित झालो नाही कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे. आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत, दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही. याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा कायदेशीर निर्णय करावा लागेल. त्यामुळे यासंदर्भात जे काही कायदेशीर आहे त्याचा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतला आहे,याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं पाहिजे, ज्यांनी खूप मेहनत केली आहे. पुढेही समिती समाजासाठी काम करेल.”

“मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी समाजासाठी काम कालही करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करेन. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, महाराष्ट्रातील कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजासाठी काम करण मी माझं कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचे ओबीसी समाजाला आवाहन

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीनंतर ओबीसी समाजातून विरोध होताना पाहायला मिळाला. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी त्या समाजाला देखील यावेळी आवाहन केले. “ओबीसी समाजात एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याचा प्रयत्न होणार आहे, असं कुठेही झालं नाही. आता ओबीसी समाजाने सगळी आंदोलने परत घेतली पाहिजेत. मी त्यांना आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोनसमाजांना एकमेकांसमोर आणणं, त्यांच्यात तिढा निर्माण करणं, हे आम्ही कधीच करणार नाही. आमच्यासाठी महाराष्ट्राची सामाजिक विण ही खूप महत्त्वाची आहे,” असेही फडणवीस म्हणाले.