Devendra Fadnavis on farmers Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू, इतर शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) संध्याकाळपासून नागपूर-हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला आहे. तसेच त्यांनी नागपूरमधील अनेक महामार्गांवर चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, या आंदोलनावर व शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की “आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचार करत आहोत. आम्ही कर्जमाफी करणार नाही असं कधीच म्हटलेलं नाही.”

सर्वसामान्यांना त्रास होईल असं काही करू नका, मुख्यमंत्र्यांचं आंदोलकांना आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आंदोलकांनी सर्वसामान्य जनतेला त्रास होईल असं काहीही करू नये. अशा प्रकारच्या आंदोलनात काही हौसे, नवसे, गवसे शिरतात. अर्थात या आंदोलनात खरे आंदोलक व शेतकरी देखील आहेत. परंतु, अनेक लोक, वेगवेगळ्या प्रवृत्ती आंदोलनात शिरून आंदोलनाला हिंसक वळण कसं देता येईल यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे.

चर्चेतून मार्ग काढला जाईल : फडणवीस

“आंदोलकांनी रेल रोको, रास्ता रोको, चक्काजाम अशा गोष्टी करू नयेत आणि आम्ही त्यांना अशा गोष्टी करूही देणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आम्ही त्यांच्या प्रश्नांबाबत पूर्ण सकारात्मक आहोत. सरकारने शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. आम्ही ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करत आहोत. माझं आंदोलकांना एकच आवाहन आहे की आपण चर्चा करून मार्ग काढूया.”

“शेतकऱ्यांची मदत करण्यास प्राधान्य”

“सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक समिती तयार केली आहे. आपल्यासमोर शेतकऱ्यांचा सध्या सर्वात प्रश्न मोठा प्रश्न आहे. कारण शेतकरी सध्या अडचणीत आहे. पावसाने ज्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं आहे, ज्यांचा शेतमाल वाहून गेला आहे, त्या शेतकऱ्यांना सर्वात आधी मदत करणं गरजेचं आहे. आपल्याला आधी शेतकऱ्यांची मदत करायची आहे, बँकांची नव्हे.”

“आपण जेव्हा कर्जमाफी करतो तेव्हा बँकांना पैसे दिले जातात. परंतु त्यातून थेट शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला बराच वेळ लागतो. आपण आत्ता जे काही करतोय त्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पैसे पाठवले जात आहेत.”

कर्जमाफी करणार नाही असं कधीच म्हणालो नाही : फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका कधीच घेतली नाही. योग्य वेळी आम्ही त्या संदर्भात निर्णय घेऊ. आज आपली प्राथमिकता काय आहे ते आपण पाहिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पैसे जाणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि आपण ते सुरू केलं आहे.”