Devendra Fadnavis On Raj Thackeray and Uddhav Thackeray : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटांपेक्षा जास्त चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे यात राजकारण आणण्याची गरज नाही’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे यामध्ये आपण काही राजकारण का आणायचं?. राज ठाकरे हे शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांना आमच्याही शुभेच्छा आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणं यात राजकारण आणायचं काही कारण नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या मनात काय?

“महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं. महाराष्ट्राच्या मनात काय आहे? हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्येही दिसेल. मात्र, काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे? ते महाराष्ट्राच्या मनातील आहे असं म्हणणं काही योग्य होणार नाही, अन्यथा ते मोठं विधान होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली?

राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरे यांना आनंद झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरील भेट ही बाळासाहेबांच्या फोटोसमोर झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही बंधूंची गळाभेटही झाली. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झाल्याचं बोललं जात आहे.

राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अगदी दोन शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “आज मला खूप आनंद झाला आहे.” दरम्यान, या भेटीवेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह आदी नेतेही उपस्थित होते.