Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाचा मुंबईत विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांची मागील १० दहा भाषणं काढा आणि त्यामध्ये विकासाबद्दलचं एक वाक्य दाखवा आणि माझ्याकडून १०० रुपये घेऊन जा’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“काही उचक्के दररोज सकाळी उठून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारतात. मात्र, अशा उचक्क्यांना उत्तर मुंबईच्या जनतेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दिलं आहे. मुंबई कोणाची? याचं उत्तर सातत्याने २०१४, २०१९, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईकरांनी दिलेलं आहे. मुंबई ही भाजपाची, मुंबई ही महायुतीची आहे हे उत्तर दिलं.”

“आज तुम्ही यांची (उद्धव ठाकरे) भाषणं पाहा. काय बोलतात? यांच्या भाषणांमध्ये, मी तर तुम्हाला १०० रुपये द्यायला तयार आहे. तुम्ही त्यांची (उद्धव ठाकरे) मागची १० भाषणं काढा आणि त्यामध्ये विकासावर एक वाक्य दाखवा. मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी विकासाच्या व्हिजनचं एक वाक्य तुम्ही मला दाखवा आणि माझ्याकडून १०० रुपये घेऊन जा. ते विकासावर बोलत नाहीत आणि बोलूही शकत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला’ : फडणवीस

“खरं म्हणजे काही लोक आपलं हसू करून घेतात. साधी बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं की कशाला पक्षावर लढायचं? मात्र, काहीजण म्हणाले की आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. आमच्या शंशाक राव आणि प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली.

‘जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे’

“भारतीय जनता पक्षात आमची परंपरा पाहा. अमित साटम साधे कार्यकर्ते, पण ते देखील मुंबई भाजपाचे अध्यक्ष झाले. आशिष शेलार यांच्यानंतर त्यांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही. अमित साटम अध्यक्ष झाले, ही भाजपाची परंपरा आहे. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात नेतृत्व जनतेतून तयार होतं. त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड म्हणून जगात एस्टॅब्लिश होतो. अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे. आम्हाला कोणीही ब्रँड सांगू नये. जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे, त्या ब्रँडचं नाव नरेंद्र मोदी असं आहे”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.