Devendra Fadnavis On Uddhav Thackeray and Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील विविध शहरांत नेते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कामाचा आढावा घेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बैठकांचा धडाका लावला आहे. यातच आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे हे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

याआधी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुंबईत एकत्रित मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्यातच दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीचे संकेत दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्री निवासस्थानी दाखल होत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आज (२७ ऑगस्ट) पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेच्या (ठाकरे) युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला वाटतं की श्रीगणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्रित आले आहेत आणि दोन्ही भावांना बाप्पा अशीच सुबुद्धी देवो’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल होत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती उत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला.

त्या प्रश्नांचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटतं की श्रीगणेशाने सुबुद्धी दिली आहे. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्रित आले आहेत. ते दोन्ही भाऊ एकत्रित राहावेत. दोन्ही भावांना अशीच सुबुद्धी मिळत राहावी अशी श्रीगणेशाच्या चरणी मी प्रार्थना करतो”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.