CM Devendra Fadnavis Reaction On Ajit Pawar Anjana Krishna Controversy: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या महिला पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून दम दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली होती. अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याला कर्तव्यापासून रोखण्याचे काम अजित पवारांनी केले, असा आरोप विरोधकांनी केला होता. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची होती, ती पूर्ण झालेली आहे. या प्रकरणाची पूर्ण माहिती आणि अहवाल माझ्याकडे आलेला नाही. मी तो जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेला आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, अजित पवार यांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेले आहे.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “खूप वेळा समोरच्या बाजूला काय चालले आहे, याची आपल्याला कल्पना नसते. अनेक वेळा आमच्याकडे निवेदने येतात, त्या निवेदनावर कारवाई करा असे आम्ही लिहितो. मात्र, त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यामध्ये खूप अंतर असते. मग अशा परिस्थितीत अधिकारी हे आमच्या नजरेस आणून देतात आणि त्या आधारावर कामे होतात. त्यामुळे याबाबत अजित पवार यांनी खुलासा केलेला आहे.”
काय आहे प्रकरण?
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू या गावी मुरूमाच्या उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी अजित पवार म्हणाले होते की, “ऐका, मी उपमुख्यमंत्री बोलत आहे. मी तुम्हाला आदेश देतो की, कारवाई थांबवा.”
मात्र कार्यकर्त्याच्या मोबाइलवर फोन आल्यामुळे पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखले नाही आणि त्यांनी आपल्या फोनवर फोन का नाही केला? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार संतापले आणि त्यांनी, “तुमच्यावर कारवाई करू का?” असे म्हटले होते.