Devendra Fadnavis On Rahul Gandhi Over SC Savarkar Remark : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहे. राहुल गांधी यांनी यापुढे जर असे कोणतेही विधान केले तर आपण स्वत:हून त्याची दखल घेऊ असेही न्यायालयाने बजावले आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसेच फडणवीसांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणारे राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानेच चपराक लावलेली आहे. आता रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? हा माझा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे स्वातंत्र्य संग्राम सैनानींचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत अशी मला आपेक्षा आहे.”

“सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने किमान त्यांना त्यांची जागा दाखवली. भारतीय स्वातंत्र्याच्या नायकांना ते अपमानीत करत होते आता ते यापुढे अपमानीत करणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे,” असेही फडणवीस म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. शुक्रवारी न्यायालयाने राहुल गांधींना वीर सावरकरांसारख्या व्यक्तींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि तुम्ही त्यांना अशी वागणूक देता अशा शब्दात सुनावले. तसेच भविष्यात कधीही अशी टिप्पणी करू नका अन्यथा न्यायालय स्वतः त्याची दखल घेईल असा इशाराही दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने वीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेले विधान हे बेजबाबदार पणाचे होते आणि त्यांनी असे बोलायला नको होते असेही म्हटले आहे.

तसेच खंडपीठाने सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानासंबंधी मानहानिच्या खटल्यात राहुल गांधी यांना जारी केलेले समन्स रद्द करण्यास नकार देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. राहुल गांधी यांनी अकोला येथे भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.