Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : राज्यात गेल्या काही दिवासांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले असून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज (३१) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तर, विरोधी पक्षातील नेते राज्य सरकारने मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, “आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा आणि कायदेशीर मार्गाने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मनोज जरांगे ज्या काही मागण्या करत आहेत त्याकडे आमचं सरकार सकारात्मकतेने पाहात आहे. कुठलीही मागणी मान्य करायची असेल तर ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. मराठ्यांचा सरसकट ओबीसीत समावेश करा ही त्यांची मागणी आहे. परंतु, त्यासमोर सामाजिक संतुलनाचा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला न्यायालयासमोर उभं राहावं लागू शकतं. म्हणूनच कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन असा निर्णय घेतला तर तो टिकणार नाही. आपण लोकांना खुश करायला असा निर्णय घेऊ शकतो. परंतु, तो निर्णय टिकणार नाही. असं केल्याने जनतेची फसवणूक होईल.”

आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत : मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील उपसमिती चर्चा करत आहे. आम्ही कायदेशीर सल्लागारांशी बोलत आहोत. तसेच यापूर्वी याविषयी न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची पडताळणी करत आहोत आणि या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत.” देवेंद्र फडणवीस टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं की या सगळ्यावर काय तोडगा निघणार? यावर ते म्हणाले, “चर्चेतून मार्ग निघेल. मात्र, आडमुठ्या भूमिकेतून तोडगा निघणार नाही. सरकार हे कायद्याने चालतं. सरकार कायदेशीर मार्गाने सर्व प्रश्न सोडवेल. कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा वापर करून आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.”