Devendra Fadnavis : गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. दोन्ही मित्र स्मारकाच्या स्वरुपात आजूबाजूला आले हा विलक्षण योगायोग आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या प्रसंगी भाषण केलं. या भाषणात त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगितल्या.
गोपीनाथ मुंडे यांनी सातत्याने संघर्षच केला-देवेंद्र फडणवीस
गोपीनाथ मुंडे यांचं जीवन पाहिलं तर सातत्याने संघर्ष करणारे गोपीनाथ मुंडे आपल्याला पाहण्यास मिळतात. सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री ही त्यांची वाटचाल त्यांच्या मेहनतीतून साकार झाली आहे. अवघ्या ३५ व्या ३७ व्या वर्षी भाजपाचे अध्यक्ष झाले. महाराष्ट्रात त्यावेळच्या भाजपा नेतृत्वाने हा निर्णय केला की तरुण रक्त हवं आहे. संघर्ष करणारी तरुणाई एकत्र केली पाहिजे त्यावेळी असे अनेक तरुण एकत्र केले. त्यांचं नेतृत्व गोपीनाथ मुंडे यांना दिली. पक्षाला माहीत होतं की सामान्य माणसांपर्यंत पक्ष पोहचवायचा असेल तर संघर्ष करणारा तरुण आपल्याला नेता म्हणून दिला पाहिजे. गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाची धुरा सांभाळली त्यानंतर पक्षाने कधी मागे वळून पाहिलं नाही इतकं मोठं संघटन त्यांनी उभारलं. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे, देशातला तर आहेच. पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष हे भाजपाला जे स्थान मिळालं त्याचा पाया रचणारे गोपीनाथ मुंडे आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी विविध यात्रांच्या माध्यमांतून संघर्ष उभा केला होता.
महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोपीनाथ मुंडे-फडणवीस
१९९० च्या दशकांत गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते कसे असावे? याचं उदाहरण जेव्हा दिलं जातं तेव्हा गोपीनाथ मुंडे हे नाव पहिलं येतं. मुघलांना संताजी धनाजी दिसायचे. मी विरोधकांना मुघल म्हणत नाही. पण तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना गोपीनाथ मुंडे झोपेतही दिसायचे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरुद्ध गोपीनाथ मुंडेंनी अनेक विषय मांडले. अलिकडे लोक हवेत बार सोडतात, दुसऱ्या दिवशी वेगळंच बोलतात. पण गोपीनाथ मुंडे अशा व्यक्तीचं नाव होतं की आरोप केला तर तो मागे घेणयाची वेळ कधीच त्यांच्यावर आली नाही. समोरच्याच्या राजीनामा घेऊनच ते खाली बसले. दाऊदचा बोलबाला जेव्हा महाराष्ट्रात होतं तेव्हा ते नाव घेऊन सत्ताधाऱ्यांना ठणकावण्याची धमकही गोपीनाथ मुंडे यांचीच होती. त्यातून महाराष्ट्रात एक वातावरण उभं राहिलं. १९९५ मध्ये गोपीनाथ राव संघर्ष यात्रा घेऊन निघाले. त्या संघर्ष यात्रेने उभा महाराष्ट्र त्यांनी ढवळून काढला असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरेंनी परिवर्तन घडवून दाखवलं-फडणवीस
एकीकडे गोपीनाथ मुंडे आणि दुसरीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा प्रकारचं रान पेटवलं की राज्यात परिवर्तन घडलं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा महायुतीचं सरकार आलं. त्या सरकारमध्ये अनेक खाती गोपीनाथ मुंडेंनी सांभाळली. सर्वात महत्त्वाचं खातं त्यांनी सांभाळलं ते म्हणजे गृहखातं. मुंबईत एखाद्याने गाडी घेतली तर त्याला खंडणीचा फोन यायचा. लोक काळी दिवाळी साजरी करायचे. त्यावेळी अंडरवर्ल्डचं राज्य चालू देणार नाही. मकोका सारखा कायदा गोपीनाथ मुंडेंनी आणला. गोळीचं उत्तर गोळीनं दिलं जाऊ लागलं. त्यानंतर अंडरवर्ल्डच्या विळख्यातून त्यांनी महाराष्ट्र बाहेर काढला. याबाबत मला गोपीनाथ मुंडेंचा अभिमान आहे. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी हजारो गोष्टी केल्या.
१५ वर्षे सत्ता नसतानाही मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त रुबाब गोपीनाथ मुंडेंचाच होता
गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व असं होतं की आपली सत्ता १५ वर्षे आपल्याकडे नव्हती, देशातही नव्हती आणि राज्यातही नव्हती. १९९९ ला आपलं सरकार आपलं सरकार थोड्या मतांनी गेलं. पण गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष सोडला नाही. अनेकदा पद गेलं की लोक विचारत नाही. पण १५ वर्षे पदावर नसतानाही मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त रुबाब असलेला नेता कुणी असेल तर ते आमचे गोपीनाथ मुंडे होते. त्यांना पदाची आवश्यकताच नव्हती. गोपीनाथ मुंडे जेव्हा रस्त्याने निघायचे त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापेक्षा जास्त साथ आणि आशीर्वाद गोपीनाथ मुंडे यांना मिळायचा. मला खूप जवळून त्यांच्याबरोबर काम करता आलं. मला त्यांनी अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्यातून मी शिकत गेलो. एखाद्या गोष्टीत कसं उत्तर दिलं पाहिजे, कुरघोडी कशी करायची हे सगळं मी त्यांच्याकडून शिकलो. गोपीनाथ मुंडे एकेका विषयावर सरकारची सालटी काढत असत. समोरच्यावर वज्राघात करताना सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था ते करायचे.
गोपीनाथरावांनी दिलेली सर्वात मोठी शिकवण मी कधीही विसरु शकणार नाही-देवेंद्र फडणवीस
गोपीनाथ मुंडेंनी सर्वात मोठी शिकवण काय तर ती शिकवण म्हणजे ते मला एक दिवस मला म्हणाले, देवेंद्र एक लक्षात ठेव सत्ता अशी असते की अनेक आमिषं आपल्या दाखवते, अनेकदा आपल्या वश करु पाहते. एक लक्षात ठेव सत्तेशी संघर्ष करायला शिक, ज्यादिवशी विरोधी पक्षात असताना सत्तेशी समझोता करशील त्यादिवशी संपत्ती वाढेल पण नेतृत्व वाढणार नाही. त्यामुळे सत्तेशी समझोता करु नकोस. मी जीवनभर ही गोष्ट पाळलं. विरोधी पक्षनेता असताना मी ते पाळलं. मधे अडीच वर्षे विरोधी पक्ष नेते पद माझ्याकडे होतं त्यावेळी सत्ताधाऱ्यांना एकही दिवस झोपू दिलं नाही कारण माझ्यासोबत गोपीनाथ मुंडेंची शिकवण होती. सत्तेशी संघर्ष करायचा समझोता नाही तो मी कधी केला नाही. मी अनेकवेळा पाहिलं होतं की गोपीनाथ मुंडे यांची एक खास स्टाईल होती. अनेकवेळा त्यांना अनेकदा कागद सापडत नसत. त्या कागदाची शोधाशोध करण्यात त्यांचा वेळ जायचा. अशा वेळी गोपीनाथ मुंडे कोरा कागद दाखवून सांगायचे हा माझ्याकडे पुरावा आहे. पण कुणाचीही हिंमत नव्हती की तो कागद दाखवा. कारण गोपीनाथ मुंडेंनी कागद दाखवला म्हणजे त्यांच्याकडे पुरावा असेल. त्यांचा कोरा कागदही सभागृहही पुरावा म्हणून स्वीकारायचं अशी आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.