राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसल्याचं मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तसेच, त्यांनी संजय राऊतांना देखील खोचक टोला लगावला आहे.
आजचा विजय सर्वार्थाने महत्त्वाचा विजय आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात राज्याच्या जनतेने भाजपाला कौल दिला होता. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसून तो कौल काढून घेण्यात आला. अशा प्रकारचं सरकार किती अंतर्विरोधाने भरलं जातं हे आपल्याला आजच्या विजयामुळे पाहायला मिळालं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले आहेत, त्यांनी शिवसेनेचे पहिले उमेदवार म्हणजे संजय राऊतांपेक्षा जास्त मतं घेतली आहेत. पियुष गोयल ४८ मतं घेऊन पहिल्या क्रमांकाने निवडून आले. तेवढीच मतं अनिल बोंडेंनाही मिळाली. तेही पहिल्या क्रमांकाने निवडून आले. धनंजय महाडिकांना ४१.५६ मतं मिळाली. जी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहेत, असं फडणवीस म्हणाले.
उद्या काय काय मुजोरी होणार आहे ते माहिती आहे. शिवसेनेचं जे मत बाद झालं, ते ग्राह्य झालं असतं तरी आमचा विजय झाला असता. नवाब मलिकांना जरी न्यायालयानं परवानगी दिली असती, तरी आमचा विजय झाला असता. हा कुठल्या जोडतोडीचा विजय नाही, तर कोटा पूर्ण करून मिळवलेला विजय आहे, असं देखील फडणवीसांनी नमूद केलं.
“स्वत:ला महाराष्ट्र, मुंबई समजणाऱ्यांना हा इशारा”
“भाजपाच्या अपक्ष आमदारांचं आणि जे आमच्यासोबत नव्हते, तरीही आम्हाला मतदान केलं असा सगळ्या आमदारांचे मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा जे स्वत:ला महाराष्ट्र, मुंबई समजतात, मराठी समजतात, त्यांना या विजयाने हे लक्षात आणून दिलं की महाराष्ट्र म्हणजे ते नाही, मुंबई म्हणजे ते नाही, इथली जनता आहे. मराठी म्हणजे जगभरातले मराठी आहेत. ही विजयाची मालिका सुरू झाली आहे. आता ही मालिका अशीच पुढे सुरू राहील”, असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला.
“चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढलो. त्यांच्या वाढदिवशी त्यांना भेट देऊ असं ठरवलं होतं. प्रत्यक्ष कोल्हापूरचा पैलवानच भेट स्वरूपात चंद्रकांत पाटलांना दिला आहे. अश्विनी वैष्णव ठाण मांडून इथे बसले, आम्हाला मदत केली. म्हणून त्यांचे आभार मानतो”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.