Devendra Fadnavis on J P Nadda Statement Controversy: लोकसभा निवडणुकांआधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा झाली होती. पूर्वी भाजपाला संघाची गरज पडत होती,आता परिस्थिती बदलली आहे अशा आशयाचं विधान त्यांनी केलं होतं. त्यावरून बरीच राजकीय चर्चा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाली होती. आता नड्डांच्या या विधानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नड्डा तेव्हा जे काही म्हणाले, ते योग्य संदर्भात समजून घेतलं गेलं नाही, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानावरून नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते जे. पी. नड्डा?
लोकसभा निवडणुकांआधी नड्डांना एका कार्यक्रमात अटल बिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकारणातली भूमिका कशा प्रकारे बदलत गेली, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नड्डांनी वरील विधान केलं होतं. “सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजपा स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळते. हा या दोन्ही कालखंडातला फरक आहे”, असं जे.पी. नड्डा म्हणाले होते.
नड्डांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून भाजपावर टीकेची झोड उठवली. उद्धव ठाकरेंना याबाबत विचारणा केली असता “आता मला आरएसएससाठी भीती वाटायला लागली आहे. भाजपा आता संघावरही बंदी आणेल”, अशी खोचक टिप्पणी उद्धव ठाकरेंनी केली होती. यासंदर्भात आता देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जे म्हटलं होतं, ते योग्य संदर्भात नाही पाहिलं गेलं”, असं फडणवीस म्हणाले. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाली. तेव्हा राष्ट्रीय भावनेने प्रेरित असा समाज तयार करणे ही संघाची संकल्पना होती. त्यामुळे व्यक्तिनिर्माणाचं केंद्र म्हणून संघानं काम सुरू केलं. त्यानंतर संघाला असं वाटलं की वेगवेगळ्या क्षेत्रांप्रमाणे राजकीय क्षेत्रातही राष्ट्रीय भावनेने प्रेरित लोक यायला हवेत. त्यातून भारतीय जनसंघाची स्थापना झाली”, असं फडणवीसांनी सांगितलं. इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केलं आहे.
“तेव्हा संघालाच सर्व गोष्टी कराव्या लागल्या. अनेक निवडणुकांमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांना संघातून राजीनामा देऊन मग जनसंघात जाऊन निवडणूक लढवावी लागली. त्यामुळेच आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटलं होतं की ती परिस्थिती आता राहिलेली नाही. भाजपा स्वत:हून मोठी होत आहे. भाजपाला स्वत:चे कार्यकर्ते मिळाले आहेत. त्यामुळे तेव्हाची जी गरज होती, ती आता राहिलेली नाही. आज आमचं अवलंबित्व हे विचारांशी बांधीलकीवर आहे”, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
“RSS कधीच राजकारणात येत नाही, पण…”
“जेव्हा जेव्हा राष्ट्रीय मुद्द्यांवर संघर्ष उद्भवला आहे अशा वेळी संघ नाही, पण संघाच्या स्वयंसेवकांनी भूमिका घेऊन भाजपाला मदत केली आहे. निवडणुकांमध्येही मदत केली आहे. त्यामुळे संघ कधीच राजकारणात येत नाही. पण जेव्हा आव्हानं निर्माण होतात, तेव्हा संघाच्या स्वयंसेवकांना असं वाटलं की आता देशासाठी आपण निवडणुकीत काम करणं किंवा जनजागृती करणं गरजेचं आहे. तेव्हा ते ही कामं करतात. या अशा कामांची गरज तर कायमच असेल असं मला वाटतं”, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी नमूद केलं.