मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांना महाराष्ट्राने तब्बल १९ वर्षांनी ५ जुलै २०२५ ला एकत्र पाहिलं. निमित्त होतं ते मराठीच्या मुद्द्याचं. हिंदी भाषेची सक्ती नको म्हणत दोन्ही पक्षांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर सरकारने जीआर काढला आणि आधीचा निर्णय रद्द केला. ज्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर आले. बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही ते ते देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं असं राज ठाकरे म्हणाले होते. तर अनाजी पंतांनी आमच्यातला आंतरपाट दूर केला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. दरम्याना आता देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांबाबत भाष्य केलं आहे. ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचं श्रेय मी घेणारच असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच एक माणूस म्हणून आपण कसे आहोत हे देखील त्यांनी उलगडलं.

लाँग ड्राइव्ह करणं मला फार आवडतं, त्यातून समाधान मिळतं-देवेंद्र फडणवीस

मी अगदी सामान्य माणूस आहे. जसं बऱ्याच जणांना गाणी आवडतात, खाणं आवडतं तसंच मलाही आवडतं. तसंच लाँग ड्राइव्हही मला आवडतं. मला त्यातून समाधान मिळतं. एखादा मित्र असेल तर त्याला घेऊन जातो किंवा परिचयाचं कुणी म्हणालं तरीही मी लाँग ड्राइव्ह करतो. मी संपूर्ण भारत अशा पद्धतीनेच पाहिला आहे. मला त्यातून मानसिक समाधान मिळतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज आणि उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचं श्रेय माझंच आहे, मी ते आधीच घेतलं आहे. शिवाय त्यांनीही मला श्रेय दिलं आहे. लोक म्हणतात तुम्ही पक्ष फोडले, कुटुंबांमध्ये कलह घडवला. मी असं काहीही केलेलं नाही. आता लोक जर असं म्हणत असत असतील ठाकरे तुमच्या मुळे एकत्र आले तर त्याचं श्रेय तर मी घेणार. माझ्याविषयी असं म्हणत असतील की ठाकरे बंधू तुमच्यामुळे एकत्र आले तर त्याचं श्रेय माझं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत त्यांनी एकत्र यावं, लढावं काही प्रश्न नाही.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आमच्याबरोबरच राहतील

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंकडे गेले आणि अजित पवार शरद पवारांकडे गेले तर काय होणार? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले असं काही होणारच नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आमच्यासह कायम असतील. एनडीएमध्येच ते असतील. असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.