रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरून उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या खडाजंगी बघायला मिळते आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “१५ ऑगस्टपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो”, असे ते म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मंत्रीमंडळ विस्तारावरून विरोधक टीका करत आहेत. मात्र, विरोधकांना असं बोलावचं लागेल. कारण त्यांचे मंत्रीमंडळ पाच जणांचेच होते. हेच पाच मंत्री ३० ते ३२ दिवस सरकार चालवत होते. मात्र, लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करणार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

१५ ऑगस्टपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार?

दरम्यान, १५ ऑगस्टपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे वक्तव्य सुधीर मुंनगटीवर यांनी केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, “त्यापूर्वीही मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – उदय सामंत यांचे हल्लेखोरांना पुन्हा आव्हान; म्हणाले, “मी तारीख आणि वार…”

मंत्रीमंडळ विस्तारावरून अजित पवारांची टीका –

“महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम सुरू होते. मात्र, सरकार पाडून महाराष्ट्राला अस्थिर करण्यात आले. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकट्याचेच मंत्रीमंडळ आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिनखात्याचे मंत्री आहेत. अशा मंत्रीमंडळाचा राज्यासाठी काडीचाही उपयोग नाही. इतरांनी तुमच्या दोघांकडे फक्त बघत बसायचे की, तुम्ही दिल्लीला कितीवेळा जाता ते मोजायचे. मुख्यमंत्री नुसतीच दिल्लीवारी करत आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही, याची नेमकी अडचण त्यांनी जनतेला सांगितली पाहिजे. मंत्रीपदाची आस अनेक आमदारांना आहे. मंत्रीमंडळ जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराज आमदार फुटून बाहेर पडतील, याची भीती मुख्यमंत्र्यांना असावी”, अशी टीका अजित पवार यांनी केली होती.