शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपावर परखड शब्दांमध्ये टीका केली होती. भाजपानं पाठीत खंजीर खुपसला असं म्हणतानाच आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेनं भाजपासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्राबाहेर उमेदवार उभे केले नव्हते, असा देखील दावा केला. यानंतर सेना-भाजपामध्ये पुन्हा एकदा सुंदोपसुंदी सुरू झाली असून आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतिहास विसरून हे लोक बोलतात…

“भाजपाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आजपर्यंत राज्याबाहेर इतर ठिकाणी उमेदवार उभे केले नाहीत”, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आदित्य ठाकरेंना इतिहास माहिती नाही. याआधी भाजपा सोबत असताना पूर्ण ताकदीनिशी शिवसेना गोव्यात उतरली होती. पण गोव्यानं प्रत्येक वेळी शिवसेनेला नाकारलं. अशी कोणती निवडणूक आहे जिथे भाजपा लढतंय म्हणून ते लढले नाहीत? गेली २०-२५ वर्ष हे लोक लढत आहेत. पण त्यांचं डिपॉझिट कधीच वाचत नाही. इतिहास विसरून हे लोक बोलतात”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

घराणेशाहीबाबत आदित्य ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले, “अशा वेळी एकच बघायला हवं की…”!

“शिवसेनेनं भाजपाला नुकसान पोहोचवण्याचाच प्रयत्न केला”

“गेल्या वेळी उत्तर प्रदेशची देखील आठवण करून दिली. राम जन्मभूमीच्या आंदोलनानंतर उत्तर प्रदेशमध्ये २०० जागा लढले होते. एका जागेवर देखील डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. उलट मित्रपक्ष असूनही भाजपाला जिथे जिथे नुकसान पोहोचवता येईल तो प्रत्येक वेळी प्रयत्न शिवसेनेने केला. पण ते कधीही यशस्वी झाले नाहीत”, असा देखील आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

“…मग आमच्यावर टीका का करताय? तुम्हाला कसली भिती आहे?” आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल!

“कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे…”

“महाराष्ट्रात सगळ्यांनी बघितलं आहे की भाजपासोबत युतीमध्ये शिवसेना निवडून आली. भाजपाच्या स्टेजवर मोदींनी घोषणा केली भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची. त्याला तुम्ही समर्थन दिलं. तुमच्या सगळ्या लोकांनी मोदींचा फोटो लावून लावून मतं मागितली. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला आणि विरोधकांसोबत गेले. राज्याच्या जनतेला नीट माहिती आहे की कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे”, असं देखील फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

“आमची जेव्हा भाजपासोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही. गेल्या ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. एनडीएमधल्या इतर पक्षांच्या पाठीत देखील खंजीर खुपसला गेला”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपावर टीका केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis targets aaditya thackeray on goa election allegations pmw
First published on: 13-02-2022 at 10:43 IST