माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे करणार कूच?

संदर्भात भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला माहिती दिली

Mumbai: Prime minister Narendra Modi talks with Maharashtra CM Devendra Fadnavis during the opening ceremony of the Magnetic Maharashtra Convergence 2018 in Mumbai on Sunday. PTI Photo by Shashank Parade(PTI2_18_2018_000261A)

धवल कुलकर्णी

महाराष्ट्रामध्ये यशाच्या दरवाज्यातून परतलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये एका मोठ्या संभाव्य बदलाची चाहूल लागली आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कदाचित केंद्रामध्ये एक मोठी जबाबदारी घेऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.

मागच्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊन सुद्धा शिवसेनेसोबत झालेल्या सुंदोपसुंदी आणि सत्ता संघर्षामुळे भारतीय जनता पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागले. जवळजवळ तीस वर्ष जुना मित्रपक्ष म्हणजे शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करताना पाहण्याची नामुष्की सुद्धा भारतीय जनता पक्षावर ओढवली.

यशाचे बाप अनेक असतात. पण पराभव बेवारस असतो. कारण त्याची जबाबदारी घ्यायला कोणीही पुढे येत नाही असं म्हणतात. अनपेक्षित झालेल्या पीछेहाटीमुळे भारतीय जनता पक्षामध्येसुद्धा एक अंतर्गत सत्ता नाट्य सुरू झालं आणि विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी न दिलेले आणि ज्यांच्या मुलीला अनपेक्षितपणे पराभवाच्या धक्क्याला सामोरे जावं लागलं ते एकनाथ खडसे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनाही परळीमधून अशाच पद्धतीने अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. पंकजा मुंडे यांच्यासारख्या इतर मागासवर्गीय बहुजन चेहऱ्यांनी फडणवीसांच्या नेतृत्वाविरोधात उघड बंड पुकारले. महाराष्ट्र भाजपामधल्या फडणवीसविरोधी गटाने असा दावा केला की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळातमध्ये त्यांच्या पक्षांतर्गत आणि मंत्रिमंडळाअंतर्गत असलेल्या विरोधकांचं खच्चीकरण केले आणि अशाच पद्धतीने शिवसेनेला सुद्धा काही बाबतीत गृहित धरले किंवा डिस्टर्ब केले. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या काही नेत्यांच्या खच्चीकरणात आणि अंतिमतः भाजपाला सत्ता गमावावी लागली. मात्र फडणवीसांचे समर्थक हे म्हणणं साफ नाकारतात.

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या माहितीनुसार फडणवीस हे कदाचित केंद्रामध्ये नवी आणि मोठी जबाबदारी घेऊ शकतात. फडणवीसांचा समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात होऊ शकतो अशा चर्चा सुरू झाल्या असल्या तरीही या भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार फडणवीस हे कदाचित पक्ष संघटनेमध्ये एक मोक्याची जबाबदारी घेतील. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यानंतर महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होऊ शकतील.

फडणवीसांच्या जवळची मंडळी एक आठवण आवर्जून सांगतात. २००९च्या लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा फडणवीसांना होती. पण उमेदवारीची माळ पडली ती सध्या तामिळनाडूचे राज्यपाल असलेल्या माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्या गळ्यात. अर्थात त्यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. त्यामुळे विरोधी बाकावरचे एक अभ्यासू आणि हरहुन्नरी आमदार असलेले देवेंद्र फडणवीस काहीशा अनपेक्षितपणे भाजपचे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री बनले. पण त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांच्या जवळचे काही लोक आपल्या नेत्याचे नाव भावी पंतप्रधान म्हणून दबक्या सूरत का होईना उल्लेख करायचे…

याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता पाटील यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मला या अशा बातम्या तुमच्याकडून आणि वर्तमानपत्रातकडूनच कळतात असे ते म्हणाले. फडणवीसांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnvis will seen in national politics dhk

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या