scorecardresearch

धामणगाव रेल्वेत पत्नीने आत्महत्या करताच पतीनेही मारली विहिरीत उडी

पती मारहाण करत असल्याने सुनीता माहेरी गेली होती. मात्र, संजयने तिला पुन्हा सासरी आणले होते. शुक्रवारी सकाळी सुनीताने गळफास घेत आत्महत्या केली.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

अमरावती येथे कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केल्याची घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे घडली. पत्नीने गळफास घेतल्यानंतर पतीने विहिरीत उडी मारली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्याचा शोध सुरू आहे.

निंभोरा बोडखा येथील सुनीता संजय दाभाडे (वय ३५) या महिलेने गावातीलच संजय दाभाडे (वय ४२) याच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. दोघेही शेती व मोलमजुरी करत होते. त्यांना प्रतीक व कार्तिक ही दोन मुले आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात वाद होत होते.

पती मारहाण करत असल्याने सुनीता माहेरी गेली होती. मात्र, संजयने तिला पुन्हा सासरी आणले होते. शुक्रवारी सकाळी सुनीताने गळफास घेत आत्महत्या केली. सुनीताने आत्महत्या केल्याची माहिती बातमी गावात पसरली. यानंतर सुनीताचा भाऊ अंकुश भीमराव डोंगरे (वय २६) हा घटनास्थळी पोहचला व त्याला सुनीता घराच्या आत गळफास लावलेल्या स्थितीत दिसली. तर संजय हा दुसऱ्या खोलीत रडत बसल्याचे त्याने पाहिले. वादविवादातून ही घटना घडल्याच्या संशयावरून अंकुशने मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन गाठले.

दरम्यान, संजयने गावातील पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली. नंतर काही गावकऱ्यांनी त्याला जवळच्या विहिरीकडे धाव घेतांना पाहिले होते. विहिरीजवळ संजयच्या चपला दिसून आल्याने संजयने विहिरीत उडी घेतल्याच्या संशय आहे. पोलिसांनी विहिरीचे पाणी काढून त्याचा शोध घेणे सुरू केले आहे. मात्र त्याचा शोध लागू शकला नाही. सुनीताच्या भावाच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालावरुन सुनीताची आत्महत्या की हत्या हे उघड होईल, अशी माहिती ठाणेदार विवेकानंद राऊत यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhaman gaw railway wife commits suicide husband jumps in well

ताज्या बातम्या