बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. आरोपींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणे,फलक लावणे, अशा बाबी वारंवार घडत आहेत. तसेच लोकप्रतिनिधीं सामाजिक सलोखा बिघडला असल्याचा खोटा आव आणला जात आहेत. धनंजय मुंडे यांनी अलिकडेच अडनाव सांगता येत नसल्यावरुन सामाजिक सलोखा बिघडल्याची तक्रारी केली होती. त्यास धनंजय देशमुख यांनी उत्तर दिले आहे.

लोकप्रतिनिधींनी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या विकृतीला दुरुस्त करण्याची गरज असताना त्यांच्याकडूनच खोटे पसरवले जात आहे. आरोपींचे समर्थन करणाऱ्यांचा निषेध करण्याऐवजी त्यांना समज देखील दिली जात नाही. हे म्हणजे अप्रत्यक्ष आरोपीला समर्थन दिल्यासारखं असल्याचं देशमुख म्हणाले.अनेकदा आरोपींचे समर्थन करण्यासाठी अजित पवार गटाचे कार्यकर्ते न्यायालयात दिसून येतात.

आरोपींकडून राबविल्या जात असलेल्या ऑपरेशन डी टू संदर्भात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात तक्रार दिल्याचे धनंजय देशमुख यांनी यावेळी सांगितले. आरोपीकडून केल्या जाणाऱ्या क्लृप्त्यांबाबत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले, आरोपी वाल्मिकने पहिल्यांदा दोषमुक्तीचा अर्ज सादर केला. तो फेटाळण्यात आल्यानंतर त्याने जामिनीचा अर्ज केला. मग ही प्रक्रिया दुसऱ्या आरोपींनी करायला सुरुवात केली. हे प्रकरण निकाली निघू नये म्हणून त्याचा गुंता वाढवायचा प्रयत्न होत आहे. ‘डिले’ आणि ‘डिरलेल्ड’ अशी रणनीती ठरवून आरोपी वागत आहेत. असा युक्तीवाद न्यायालयात केला असल्याचे उज्वल निकम म्हणाले.

धारूर पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर कदाचित देशमुख यांची हत्या घडली नसती. या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. त्याचे उत्तर पोलिसांना देता आलेले नाही. तपासातील ही मोठी त्रुटी असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. त्या आरोपीचे नक्की झाले ते पोलिसांनाच माहीत आहे. धनंजय मुंडे यांनी अलिकडेच सामाजिक सलोखा बिघडल्याचे वक्तव्य केले होते. ‘ बीड मधील पोलिसांना त्यांच्या गणवेशावरील नावपट्टीवर आडनाव लावता येत नाही. ही सामाजिक समता आहे का,’ असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप केला आहे.